शनिभक्तांची लटकूंच्या त्रासातून सुटका!

0

देवस्थान व पोलिसांनी केले प्रयत्न

शनिशिंगणापूर (वार्ताहर) – शनिशिंगणापुरात भाविकांची आर्थिक लूट या मथळ्याखाली बुधवारी सार्वमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शनैश्‍वर देवस्थान सुरक्षा यंत्रणा व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. संपर्कयंत्रणा दिवसभर राबवून लटकूंचा बंदोबस्त करण्यात जुंपली होती.

शनिशिंगणापूरमध्ये सकाळीच वाहतूक पोलिसांचा ताफा येऊन धडकला. लटकूंची धरपकड सुरू होताच सर्व लटकू पसार झाले. लटकूंप्रमाणेच येथील भिकार्‍यांचा बंदोबस्त करण्याचीही वेळ आली आहे. भाविकांच्या गाड्यांना 7 ते 8 भिकारी गराडा घालतात.

महिला भिकारी कडेवर लहान मूल घेऊन भावनिक साद घालतात. अपंग व वृद्ध आई-वडील यांच्या नावावर शेतजमीन, घर असलेले काही तरुण सकाळीच त्यांना दुचाकीवरून आणून येथे भीक मागावयास सोडतात व सायंकाळी पुन्हा घरी घेऊन जातात. या भिकेच्या पैशावर काही लोक व्याजाचा धंदा करत असल्याची चर्चाही परिसरात आहे.

काल बुधवारी शिंगणापुरात लटकूंची वर्दळ व सुसाट धावणार्‍या मोटारसायकली नसल्यामुळे ग्रामस्थ व शनिभक्तांनी समाधान व्यक्त करून सार्वमतला धन्यवाद दिले. एक दिवस त्रासातून सुटका झाली. दररोज अथवा अधूनमधून अशी मोहीम राबविली तर या त्रासातून शनिभक्तांची नक्कीच कायमस्वरुपी मुक्तता होईल असे मत अनेक शनिभक्त व ग्रामस्थांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*