उद्या ‘सापुतारा मॅरेथॉन’

मराठी अभिनेता सुयोग गोरेच्या उपस्थितीत धावणार शेकडो स्पर्धक

0
नाशिक । गुजरातमध्ये मान्सून महोत्सवास प्रारंभ होत आहे. अनेक पर्यटकांची सापुतार्‍यात मांदियाळी आहे. या पार्श्वभूमीवर मॅरेथॉनर्स क्लब आणि दैनिक देशदूतच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.13) सापुतार्‍यात ‘सापुतारा रन फॉर हेल्दी हार्ट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी शेकडो स्पर्धकांनी नोंदणी केली असून यंदाच्या मान्सून महोत्सवात सापुतार्‍यातील पर्यटकांना वेगळा अनुभव या रनच्या माध्यमातून घेता येणार आहे.

हिरव्या निसर्गाने नटलेल्या गुजरात राज्यात डांग जिल्ह्यातील सापुतारा लेक ते महाराष्ट्रातील कळवण तालुक्यात असणार्‍या धनूली या डोंगराळ भागातील गावादरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही मॅरेथॉन 10 किमी, 5 किमी व 3 किमी अशा तीन टप्यात घेतली जाणार आहे. स्पर्धकांना रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सापुतारा येथील लेक गार्डनजवळ जमण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळी सहा वाजता पहिल्या टप्प्यातील स्पर्धक सापुतार्‍याहून धनूलीकडे कूच करतील, 5 किमीचा दुसरा टप्पा लगेचच पंधरा मिनिटांनी सुरु होईल त्यानंतर स्पर्धेचा शेवटचा तीन किमीचा टप्पा साडेसहा वाजता पार पडणार आहे.
या स्पर्धेसाठी अनेक दिवसांपासून तयारी पुर्ण करण्यात येत असून शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. स्पर्धेतील विजेच्या स्पर्धकांना मेडल, बक्षिस स्वरुपात रोख रक्कम दिली जाणार आहे. स्पर्धेचे तीनही टप्पे पुर्ण झाल्यानंतर बक्षीस वितरण आणि समारोप संपन्न होईल.

या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते सुयोग गोरे, दैनिक देशदूतचे संचालक संपादक विश्वास देवकर, गुजरात टुरीझम विभागाचे महाव्यवस्थापक आर.जे. भोसले, डांग ग्रामीणचे सापुतारा येथील पोलिस उपनिरिक्षक श्री धाकडा, कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक राहूल फुला आदिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेसाठी मॅरेथॉनर्स क्लब, दैनिक देशदूत, ग्रेप काउंटी, गुजरात पर्यटन विभाग, ईशा पब्लिसिटी, बनकर सिक्युरिटी आणि फे्रंडस् समुहाचे सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

*