सांगवी व पाडोशी धरणांनी तळ गाठला

0

समशेरपूर ( वार्ताहर )- हरीत क्रांतीचे स्वप्न फुलविणार्‍या आढळा नदीवरील सांगवी व पाडोशी धरणांचे चालू वर्षी सिंचन क्षेत्रास अवघ्या अर्ध्या आवर्तनावरच तहान भागवावी लागली. दुसर्‍या आवर्तनाची मागणी करून शेतकरी जळून गेला. पण आवर्तन सुटलचं नाही. रब्बी हंगाम उभा जळून गेला व उन्हाळ्यातील पिण्याच्या पाणी टंचाईत आज मास्याप्रमाणे तडफडत आहे. याउलट धरण पाणलोटातील शेतकर्‍यांनी राहिलेले पाणी मनसोक्त उचलून शेती फुलविली. आवर्तनास राजकीय रंग चढल्याने वादग्रस्त ठरून आवर्तन शेवटपर्यंत सुटलेच नाही व पाण्याने तळ गाठला आहे.

आढळा नदीवर सांगवी 72.23 व पाडोशी 145.56 दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेची दोन धरणं आहेत. दोन्ही धरणांचे संयुक्त आवर्तन सुटते. सिंचन क्षेत्रास दोन-तीन आवर्तन मिळत होती. हा दर वर्षांचा अनुभव. चालू वर्षी लवकर आवर्तन सोडल्याने फक्त 19 दशलक्षघनफूट पाणी पहिल्या आवर्तनात खर्ची पडले. दरवर्षी आवर्तनास 28 ते 30 दशलक्षघनफूट पाणी खर्ची पडून दोन-तीन आवर्तन मिळत होती. चालू वर्षी आज सांगवीत मृत साठ्याच्या खाली पाणी पातळी गेली. (मृतसाठा 15 दशलक्षघनफूट) तर पाडोशीत 39 दशलक्षघनफूट पाणी शिल्लक आहे.
या दोन्ही धरणांच्या पाणलोटातील लाभक्षेत्रात सांगवी, पाडोशी, एकदरे, पिंपळदरावाडी, कोकणवाडी, खिरविरे, कोभांळणे, जायनावाडी, शेरेवाडी,ही गावे आहेत. तर सिंचन क्षेत्रात सांगवी केळी,रुम्हणवाडी, टाहाकारी, नागवाडी, घोडसरवाडी, समशेरपूर, सावरगावपाट, ही गावे आहेत.

चालू वर्षी आवर्तन वादात पाणलोट हसले तर सिंचनक्षेत्र रडले. पाणलोटातील शेतकर्‍यांनी उपसा सिंचन योजना मार्गाने सर्व पाणी उचलले. यापुढे सिंचन क्षेत्रास पाणी मिळण्याची आशा राहिली नाही.
चालू वर्षी सोडलेले आवर्तन बंद करण्यासाठी व आवर्तन सोडण्यासाठी रास्तारोको, आरोप प्रत्यारोप, उपोशणं, शेतकरी, कार्यकर्ते, नेते, मंत्री, अधिकारी यांच्या मंत्रालयापर्यंत बैठका झाल्या. पण शेवटपर्यंत आवर्तन सुटले नाही. पाणलोटातील शेतकर्‍यांनी उचलून सर्व पाणी संपविले. आता दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे.

पाणलोटात पुढील वर्षी 25 ते 30 उपसा जलसिंचन योजना चालू करून, आमचे हक्काचे पाणी आम्ही उचलणार आहोत. धरणाखालील गावे सिंचनात नाहीत. तेव्हा त्यांना पाणी सोडण्याचे कारणच नाही.
लक्ष्मण साबळे, पाणलोटातील शेतकरी, पाडोशी

धरण सिंचन क्षेत्रास हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, चालू वर्षी पाण्याचे राजकारण करून शेती व शेतकरी जाळला. यापुढे शेतकरी सहन करणार नाही. हक्क दाखवून पाणी शासनाकडून मिळविण्यास प्रयत्नशिल राहू.
विजय एखंडे
सिंचन क्षेत्रातील शेतकरी, टाहाकारी

LEAVE A REPLY

*