संगमनेरात अतिक्रमण हटाव मोहीम; पालिका प्रशासनाची धडाकेबाज कारवाई

संगमनेरात अतिक्रमण हटाव मोहीम; पालिका प्रशासनाची धडाकेबाज कारवाई

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील वादग्रस्त ठरलेल्या जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत संपूर्ण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. गर्दीच्या ठिकाणावरील अतिक्रमण हटविल्याने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

जोर्वे नाका परिसरात किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीत जोर्वे येथील युवकांवर धारदार शस्त्राने वार केल्याने 8 जण गंभीर जखमी झाले होते. जोर्वे नाक्यावरील रस्त्यावरून जोर्वे, कोल्हेवाडी, रहिमपूर या गावातील ग्रामस्थ दररोज ये-जा करतात. जोर्वे नाक्यावरील काही युवकांकडून वारंवार या ग्रामस्थांना दमदाटी होत होती. जोर्वे येथील युवकांना मारहाण झाल्याने या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमण त्वरीत हटविण्यात यावे, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली होती. यानंतर लगेचच पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात या परिसरातील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.

या कारवाईनंतर संपूर्ण शहरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला. संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत काल शहरातील अतिक्रमण हटविले. संपूर्ण फौज फाट्यात अतिक्रमण हटाव पथकाने शहरातील अतिक्रमण हटविले. संगमनेर बस स्थानक, नवीन नगर रोड, दिल्ली नाका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नाशिक रोड, नेहरू चौक, सय्यद बाबा चौक, अकोले नाका, बी.एड कॉलेज सर्कल या परिसरातील छोटे मोठे अतिक्रमण काल हटविण्यात आले. दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान स्वच्छता निरीक्षक अरविंद गुजर यांना एक लोखंडी पाईप तोंडावर लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत.

मुख्याधिकारी राहुल वाघ हे आपल्या कर्मचार्‍यांसह स्वतः या मोहिमेत सहभागी झाले होते. काही ठिकाणी अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटविले. अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने रस्ते मोकळे झाले. नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटव मोहीम सातत्याने राबवून शहरांमध्ये पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com