वनीकरणासाठी खरशिंदे दत्तक

0

महसूल कर्मचार्‍यांचा स्तुत्य उपक्रम

संगमनेर (प्रतिनिधी) – ग्लोबल वार्मिगच्या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी बनली आहे. पर्यावरण रक्षणासाठी संगमनेर तालुक्याच्या महसूल विभागाच्या सेवकांनी श्रमदान व वनीकरणासाठी खरशिंदे या गावाची निवड करून सामाजिक बांधिलकी जपत राज्यातील इतर विभागांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

दंडकारण्य अभियानातून प्रेरणा घेत खरशिंदे येथे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व वनीकरण विभागाच्या कर्मचार्‍यांनी वृक्षारोपनासाठी श्रमदानातून सुमारे 1300 खड्डे खोदले. यावेळी उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, शिरस्तेदार सुरेश भालेराव, नायब तहसीलदार दत्ता जाधव, निवडणूक नायब तहसीलदार अशोक रंधे, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, लागवड अधिकारी हर्षल पारेकर, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, समन्वयक बाळासाहेब उंबरकर, सरपंच मीनाताई भोर आदींसह ग्रामस्थ, मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी बनली असून जागतिकीरणाच्या नावाखाली वाढलेले प्रदूषण, वृक्षतोड यामुळे ग्लोबल वॉर्मिगचा धोका वाढला आहे. तो कमी करण्यासाठी वृक्षारोपण व पर्यावरणाचे संवर्धन करणे भावी पिढयांसाठी काळाची गरज बनली आहे. यासाठी थोर स्वातंत्र सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सजीवसृष्टीच्या रक्षणासाठी सुरू केलेले दंडकारण्य अभियान माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ बनली आहे.

प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले होते. यातून प्रेरणा घेत सामाजिक बांधिलकी जोपासत संगमनेर महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी श्रमदान व वृक्षरोपणासाठी संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गाव दत्तक घेऊन उंबरेश्‍वर डोंगरावर वृक्षारोपणासाठी सुमारे 1300 ख्ड्डे खोदले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सर्व कर्मचार्‍यांना वनभोजन देण्यात आले.

निसर्गाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे. प्राणवायू देणारे वृक्षरोपण करणे, त्यांचे संवर्धन करणे यासाठी महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने हे काम हाती घेतले आहे. खरशिंदे परिसरात आता खड्डे घेण्यात आले असून जुलै महिन्यात येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यावर्षी या ठिकाणी अधिकाधिक वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले जाणार आहे.
भागवत डोईफोडे, प्रांताधिकारी, संगमनेर

LEAVE A REPLY

*