संगमनेरचा कचरा प्रश्‍न पेटणार

0
रायतेवाडीचे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात 
संगमनेर (प्रतिनिधी) – नगरपालिका शहरातील कचरा हा संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोवर टाकत असताना संगमनेर खुर्दच्या ग्रामस्थांनी त्यास विरोध केल्याने नगरपालिकेने रायतेवाडी फाटा येथे कचरा टाकण्यास सुरुवात केली. मात्र तेथे कचरा टाकल्याने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येऊन जमिनी नापीक व पाणी दूषित होऊ लागल्याची तक्रार ग्रामस्थांनी करुन कचरा टाकण्यास विरोध केला आहे. त्या ठिकाणी नगरपालिकेने कचरा टाकू नये, याबाबतचे निवेदन संगमनेर खुर्द व रायतेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी मुख्याधिकार्‍यांना दिले आहे. कचरा टाकण्याचे काम त्वरीत थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
संगमनेर खुर्द येथे रायतेवाडी फाट्या नजीक उदय ढोमसे व इतर ढोमसे कुटुंबांच्या मालकीच्या सर्वे नंबर 41/1 या जमीन मिळकती आहेत. सदर मिळकती या खाच खळग्याच्या आहेत. सदर मिळकतीमध्ये यापूर्वी संगमनेर नगरपालिकेने सुमारे 30 ते 40 फूट खड्डा खोदून संगमनेर खुर्द येथील सर्व्हे नंबर 72 व 73 मधील कचरा डोपोतील सर्व कचरा 2016 मध्ये सदर मिळकतीमध्ये गाडला होता व जमिनीचे सपाटीकरण केले होते. ज्या ठिकाणी कचरा गाडला आहे, त्या जमिनीच्या पूर्व बाजूने रायतेवाडी व संगमनेर खुर्द ची शिव व ओढा आहे.
सदर ओढ्यास चंदनापुरी येथील तामकड्यातून पावसाळ्यामध्ये पाण्याचा स्त्रोत सुरू असतो. तसेच सदर ओढ्यावर महाराष्ट्र शासनाने एक के. टी वेअरचे काम सुमारे 20 वर्षापूर्वी केलेले आहे. सदर के. टी. वेअर हे मागच्या वर्षी पूर्णपणे ओव्हरफ्लो झाले होते. मौजे संगमनेर खुर्द येथील रायतेवाडी फाट्यानजीक सर्व्हे नंबर 41/1 व तेथील शेजारील जमिनीमध्ये कचरा गाडल्यामुळे सदरचे के. टी. वेअरचे पाणी देखील दूषित झाले. सदर आढ्याशेजारील व केटीवेअर शेजारच्या जमिनीमध्ये कचरा गाडल्यामुळे ओढ्यास लाल रंगाचे पाणी येत आहे. विहीरींचे पाणी दूषित झाल्यामुळे ते पाणी पिकांना व जनावरांना देता येत नाही.
कचरा गाडल्यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यापूर्वी कचरा गाडल्यामुळे स्थानिक रहिवासी गोरख मांडेकर यांच्या कुटुंबातील सर्वांनाच चिकण गुणियाची बाधा झाली होती.  आता सध्या नगरपालिकेच्यावतीने रायतेवाडी फाटा शिवारात खड्डे घेऊन कचरा टाकून तो गाडण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.
या ठिकाणी कचरा टाकण्याबाबत नगरपालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतलेली नाही, बेकायदेशिररीत्या सदरचे काम नगरपालिका करत आहे. सदर कचरा टाकणे व गाडणे या कामास स्थानिकांचा विरोध असून पालिकेने काम थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा, सखाहरी मांडेकर, संतोष मांडेकर, अरुण मांडेकर, भारत गायकर, स्वाती मांडेकर,
संभाजी मांडेकर, शैला मांडेकर, भास्कर मांडेकर, मारुती मांडेकर, मयूर मांडेकर, ताराबाई खुळे, सुभाष सुपेकर, रूपाली सुपेकर, कैलास सुपेकर, संजय खुळे, विजय खुळे, रामा लोखंडे, नंदू गुंजाळ, विकास गुंजाळ, सोमनाथ शिंदे, रामनाथ शिंदे, गोरक्षनाथ शिंदे, सुभाष शिंदे आदींनी दिला आहे. या बाबतचे निवेदन मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*