संगमनेरात 22 कॅमेर्‍यांचा ‘वॉच’

0

रविवारी बसविण्यास प्रारंभ; गुन्हेगारांना बसणार चाप

 

संगमनेर (प्रतिनिधी) – सावधान! आपण तिसर्‍या डोळ्याच्या कक्षेत आहात.. लवकरच शहराच्या चौकाचौकांत मनात हेतू घेऊन वावरणार्‍यांसाठी असा सावधानतेचा इशारा झळकणार आहे. संगमनेर पोलीस व राजस्थान युवक मंडळाने पुढाकार घेत शहरातील काही दानशूरांच्या मदतीने हा उपक्रम अंतिम टप्प्यात नेला आहे. येत्या रविवारी होत असलेल्या कार्यक्रमात 22 कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती या उपक्रमाचे समन्वयक पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी दिली.

 

 

राज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने तेथील गुन्हेगारी नियंत्रणात आणणे पोलिसांना अधिक सोयीचे बनले आहे. त्या अनुषंगाने संगमनेरातही हा प्रयोग साधता येईल या हेतूने संगमनेर पोलिसांनी राजस्थान युवक मंडळाला सोबतीला घेऊन शहरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, मोठे व्यापारी यांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी केला आहे.

 

 

लोकसहभागातून उभ्या राहत असलेल्या या बहुचर्चीत उपक्रमाने पोलिसांवरील कामाचा ताण कमी होण्यासोबतच विविध गुन्हेगारी घटनांनाही आळा बसणार आहे. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविण्याच्या एकामागून एक घटना, महिलांची छेडछाड, मोटारसायकल लांबविण्याचे प्रकार, वाळू, गुटखा व अन्य अंमली पदार्थांची तस्करी, जातीय तणाव यासारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिसांना करावे लागते.

 

 

त्यातच दररोज घडणार्‍या छोट्या-मोठ्या घटना, सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम यासाठीही पोलिसांना तैनात असावे लागते. यातून पोलिसांवरील कामाचा ताण प्रचंड वाढल्याने अनेक गुन्ह्यांचे तपासही प्रलंबित आहेत. साहजिकच त्यामुळे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते.

 

 

यासर्व समस्यांवरील रामबाण उपाय म्हणजे सी.सी.टी.व्ही कॅमेर्‍यांची शहरातील प्रमुख मार्गावर 24 तास नजर. त्यासाठी संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात व पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमासाठी शासकीय स्तरावरून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने लोकसहभाग आवश्यक होता.

 

शहराची गरज लक्षात घेऊन राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनिष मालपाणी यांनी पोलिसांच्या हातात हात घालून या उपक्रमासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी, बँका यांची मदत जमा करण्यात आली.

 

 

या बहुचर्चीत उपक्रमाचा पहिला टप्पा येत्या रविवारी दि 6 ऑगस्ट रोजी चावडी चौकापासून सुरू होणार आहे. चावडी चौक, गवंडीपुरा, सय्यदबाबा चौक, तेलीखुंट, तीनबत्ती चौक, गणेशनगर व 132 के.व्ही सबस्टेशन या परिसरात एकूण 22 कॅमेरे बसविले जाणार आहेत. 24 तास रस्त्यांवर नजर रोखणार्‍या या कॅमेर्‍यांवरील प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.

 

 

24 तास शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी या चित्रीकरणावर लक्ष ठेवणार आहेत. मोठ्या प्रयत्नातून पूर्ततेकडे गेलेल्या या उपक्रमाच्या शुभारंभासाठी श्रीरामपूर विभागाचे अपर अधीक्षक रोहिदास पवार, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपअधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, पोलीस दलातील अन्य अधिकारी व कर्मचारी, राजस्थान मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित राहणार आहेत.

 

 

संगमनेरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सी.सी.टी.व्ही.चा प्रभावी वापर होईल. शहरातील दानशूर नागरिकांनी या उपक्रमासाठी आम्हाला भक्कम पाठबळ दिले आहे. लोकसहभागातून येत्या रविवारपासून सुरू होणारी ही प्रणाली जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांसाठी आदर्श ठरेल. या कॅमेर्‍यांद्वारे टिपल्या जाणार्‍या प्रत्येक घटना व घडामोडीवर बारीक नजर ठेवण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये पोलीस कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे. रविवारी सकाळी 9 वाजता चावडी चौकात होत असलेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला संगमनेरकरांनी जरुर उपस्थित रहावे.
                          – अशोक थोरात, पोलीस उपअधीक्षक-संगमनेर

 

सामाजिक कार्यकर्ते सचिन पलोड यांच्या संकल्पनेतून पो. नि. श्यामकांत सोमवंशी यांच्या कार्यकाळात या उपक्रमाची पायभरणी झाली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक डॉ. अजय देवरे यांनीही यासाठी मोठी मेहनत घेतली. व्यापारी असोसिएशनने त्यासाठी मदत करण्याचे आश्‍वासनही दिले. मात्र पुढे केवळ श्रेयाची लढाई सुरू झाल्याने हा उपक्रम बारगळला. त्यातच डॉ. देवरे यांची बदली झाली. त्यांच्या निरोप समारंभात त्यांनी याविषयीची खंतही व्यक्त केली होती. मात्र नव्याने रुजू झालेल्या पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी सुरुवातीपासूनच हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतल्याने अखेर तो यशस्वी झाला.

LEAVE A REPLY

*