वाळू ठेकेदारावर गुन्हा

0

अटी व शर्तींचा भंग केल्या प्रकरणी

जिल्हाधिकारी पथकाची कारवाई, 10 ट्रॅक्टर, 2 जेसीबी, 22 बोटी, 10 ट्रक जप्त

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- तालुक्यातील राजापूर हद्दीत घोड नदी पात्रातील घेतलेल्या वाळू लिलावाच्या अटी व शर्तीचा भंग करुन वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारींची दखल जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी घेतली.त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दि. 26 रोजी सायंकाळपासून सुरु केलेेेली कारवाई दि. 27 रोजी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दोन दिवस सुरु असलेल्या कारवाईमध्ये एकूण 22 बोटी, 10 ट्रक, 17 ट्रॅक्टर, 2 जेसीबी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरायर्पंत सुरु होते.
श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील घोड नदी पात्रातील 1802 ब्रास वाळूचा लिलाव ज्ञानदेव अरुण शेलार यांनी 90 लाख दहा हजार रुपयांना घेतला होता. दि. 17 डिसेंबरपासून वाळूचा उपसा सुरु केला होता. मात्र या ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी घेतली.

यासाठी जिल्हाधिकारी महाजन यांनी महसूल व पोेलीस प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने पथक तयार केले. या पथकाने राजापूर येथील नदी पात्रात दि. 26 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास छापा टाकला. या कारवाई मोहिमेत जिल्हाधिकारी महाजन यांच्या समवेत प्रांताधिकारी गोविंद दानेज, उपविभागीय पोलीस अधिकारी सूदर्शन मुंढे, बेलवंडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे या अधिकार्‍यांसमवेत महसूल व पोलीस असे एकूण साठ जणांच्या पथकाचा समावेश होता.
हे पथक नदी पात्रात दि. 26 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास दाखल झाले. नदीपात्रात नियमापेक्षा वाळूची उपसा सुरु असल्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी कारवाईच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. त्यानंतर नदीपात्रात एकच धावपळ सुरु झाली. वाळूची वाहतूक व उपसा करणार्‍या वाहनाच्या चालक व मालकांनी नदीपात्रातून धूम ठोकली. शुक्रवारी सायंकाळी सुरु झालेली कारवाई शनिवारी सायंकाळीपर्यंत सुरु होती.
या कारवाईमध्ये 2 जेसीबी, 17 ट्रॅक्टर, 22 बोटी, 10 ट्रक असा कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाळू ठेकेदार ज्ञानदेव शेलार यांच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात वाळू लिलावाच्या अटी शर्थीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. राजापूर येथील नदीपात्रात शेलार यांच्या ठेका घेतलेल्या ठिकाणावर कारवाई मोहिम राबवून मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले.

पथकात चालक नसल्याने अडचणी वाढल्या
नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या पथकामध्ये वाहने चालविणार्‍या चालकांची संख्या कमी होती. तसेच वाळूच्या वाहतूक व उपसा करणार्‍या वाहनांच्या चालकांनी चावीसह पलायन केल्याने वाहने नदी पात्रातून बाहेर काढण्यात अडचणी आल्या. तसेच वाळूतून वाहने काढताना पथकाला चांगलीच कसरत करावी लागली. प्रशिक्षित चालक नसल्याने वाहने नदीपात्रातून बाहेर काढताना वेळ जास्त लागला. वाहने नदीपात्रातून बाहेर काढल्यानंतर बेलवंडी पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आली. तेथून तहसील कार्यालयात नेण्यात आली.

LEAVE A REPLY

*