बागायती जमिनी जिरायत दाखविल्याने समृध्दीच्या थेट खरेदीवर शेतकर्‍यांचा बहिष्कार

0
कान्हेगाव (वार्ताहर)- समृध्दी महामार्गासाठी शासनाने थेट खरेदी पध्दतीने शेतकर्‍यांच्या जमिनी खरेदी करण्यास सुरूवात केली. बागायती जमिनी चारपट तर जिरायत जमिनीस दुप्पट दर दिले जात आहे. कोपरगाव तालुक्यातील बहुतांंशी गावांतील जमिनी महसूल विभागाने जिरायत दाखविल्याने शेतकर्‍यांनी या थेट खरेदी पध्दतीवर बहिष्कार टाकला असून आमच्या शेत जमिनीस बागायतीचा दर दिल्यास थेट खरेदी देणार असल्याचा ठराव भोजडे येथील प्रकल्प बाधित शेतकर्‍यांनी घेतला आहे.
शासनाने कोपरगाव तालुक्यातील बहुतांशी गावांतील शेतजमिनी जिरायत दाखविल्या आहेत. समृध्दि महामार्गासाठी थेट खरेदी पध्दतीने बागायत जमिनीस चारपट मोबदला दिला जातो. मात्र जिरायत जमिनीस दुप्पट दर दिले जात आहेत. महसूलने या अकरा गावांतील जमिनी जिरायत दाखविल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी बैठक घेऊन जोपर्यंत शासन आमच्या जमिनी बागायत दाखवत नाही तोपर्यंत आम्ही थेट खरेदी पध्दतीने जमीन खरेदी देणार नाही असा एकमुखी निर्णय घेतल्याने अधिकार्‍यांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
भोजडे येथील शेेतकर्‍यांनी सांगितले आमच्या जमिनी बागायती आहेत. पारंपरिक बागायती व ऊस पीक घेतले आहे. गावात दोन पाणी वापर संस्था आहेत. तरिही जमिनीवर जिरायत नोंदी लावल्या आहेत. आमच्या जमिनीवर बागायती नोंदी लावून त्याप्रमाणे दर द्यावा अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.
भोजडे येथील शेतीचा शासनाने 13 ते 72 लाख असा दर काढला असून तो शेतकर्‍यांना मान्य नाही. भोजडे येथील 32.984 इतके क्षेत्र समृद्धी महामार्गात जाणार आहे. यावेळी शिवाजी ठाकरे, चारुदत्त सिनगर, ज्ञानेश्वर सिनगर, फारुख पटेल, युसूफ पटेल, जिजानाथ घाट, शरद जगताप, रामभाऊ थेटे, शंकर सिनगर, आप्पासाहेब घट, श्री. ढोले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*