मतांच्या साठमारीत नीतीमत्ता हारली

0

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी गुजरातमधून मिळविलेला विजय हा चमत्कार मानला गेला.

ते निवडून आले असले, तरी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने गुजरातेत ज्या घडामोडी घडल्या, त्या काँग्रेसने अस्वस्थ व्हाव्यात अशाच आहेत.

याखेरीज लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीनेही या घटना अत्यंत चिंताजनक ठरतात.

राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हटले जात असले तरी या सभागृहात निवडल्या जाणार्‍या सदस्यांच्या निवडणुकांविषयी आणि त्यातील निकालांविषयी सर्वसामान्यांना फारशी रुची नसते.

कारण हे खासदार नेमके काय काम करतात, असा प्रश्न सामान्यजनांना पडलेला असतो. मात्र मंगळवारी झालेल्या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले होते.

याचे कारण या निवडणुकांमध्ये देशातील प्रमुख दोन राष्ट्रीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एका बाजूला भाजपाध्यक्ष अमित शहा होते; तर दुसर्‍या बाजूला अहमद पटेल.

लेखक -प्रा. पोपट नाईकनवरे

सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार असणार्‍या पटेलांचा काँग्रेसच्या ध्येयधोरणांमध्ये आणि व्यूहनीतीमध्ये महत्त्वाचा सहभाग होता.

किंबहुना अनेकदा 10 जनपथवरील निर्णय पटेल परस्परच घेतात, अशी टीकाही झालेली पाहायला मिळाली. यूपीए शासनाच्या काळात अनेक मंत्री पटेलांना दबकून असल्यासारखे वागत.

काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असणार्‍या पटेलांना पराभूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने चक्रव्यूह रचला होता. तो भेदण्यात पटेलांना यश आले आणि पाचव्यांना राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला खरा; मात्र ही झुंज देताना त्यांना घाम फुटला हे नक्की. गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनीच त्यांची साथ सोडत भाजपचा रस्ता पकडल्यामुळे पटेलांची गोची झाली होती.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी झालेले मतदान आणि या निवडणुकीदरम्यान घडलेल्या घडामोडी लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहेत.

आमदार निष्ठा कशा बदलतात, हे या निवडणुकीतून दिसले, तसेच घोडेबाजाराचे आरोपही धडधडीतपणे सिद्ध होताना दिसले. मतदानानंतर दोन तासांत काँग्रेसचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ तीन वेळा आणि त्यांचा पाठलाग करीत असल्याप्रमाणे भाजपचेही प्रतिनिधीमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले.

काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना विजयासाठी आवश्यक असणारी 45 मते त्यांना मिळालेली नसावीत, याची काँग्रेसला खात्री पटली होती.

त्यामुळे ज्या दोन बंडखोर काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, त्यांची मते बाद ठरवण्यापलीकडे काँग्रेसला पर्याय उरलेला नव्हता.

या दोन आमदारांनी आपल्या मतपत्रिका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दाखविल्याचा काँग्रेसचा आरोप होता. निवडणुकीच्या नियमांनुसार, मतांची गोपनीयता राखली जाणे बंधनकारक आहे.

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजाराला नेहमीच ऊत येतो. तो टाळण्यासाठी सर्व पक्षांच्या सहमतीने निवडणूक आयोगाने एक नियम तयार केला.

मतदान केल्यानंतर आमदाराने आपली मतपत्रिका आपल्या पक्षाच्या निवडणूक एजंटला दाखवून मतपेटीत टाकायची, असा हा नियम आहे.

परंतु काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी अतिउत्साहात मोठी चूक केली. त्यांनी आपल्या मतपत्रिका काँग्रेसचे निवडणूक प्रतिनिधी शक्तिसिंह गोहिल यांना दाखवल्याच; शिवाय काही सेकंदांसाठी अमित शहांनाही दाखवल्या.

अर्थात, अमित शहांनी या मतपत्रिका बघितल्या की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. प्रथम निवडणूक अधिकार्‍यांकडे आणि नंतर निवडणूक आयोगाकडे धाव घेत काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला आणि मतमोजणी थांबवली गेली.

तब्बल नऊ तास मतमोजणी ठप्प होणे ही लोकशाहीतील क्लेषकारक घटना होय. एकदा आयोगाकडे एखादी तक्रार गेली की तिचे निरसन होईपर्यंत मतमोजणी होणे शक्य नसते.

निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ पाहिला. काँग्रेसच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आयोगाला दिसून आले. त्यामुळे निर्णय काँग्रेसच्या बाजूने गेला.

तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचा विजय झाला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची म्हणजे ओघाने काँग्रेसची राजकीय ध्येयधोरणे ठरवणारे अहमद पटेल सलग पाचव्या वेळी राज्यसभेत पोहोचल्याचा आनंदही काँग्रेसला झाला असेल.

काँग्रेसमध्ये बंडखोरी करणारे बलवंतभाई राजपूत यांनाच उमेदवारी देऊन भाजपने अचूक मेख मारली होती. गुजरात विधानसभेत भाजपच्या बाजूचे 121 आमदार आहेत. काँग्रेसकडे आधी 57 आमदार होते.

परंतु सहा आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे काँग्रेसच्या तंबूत केवळ 51 आमदार शिल्लक राहिले. विधानसभा सदस्यांची संख्याही यामुळे घटून ती 176 झाली होती. विजयासाठी कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला 46 मतांची आवश्यकता होती.

भाजपकडे 31 मते अतिरिक्त असतानासुद्धा या पक्षाने काँग्रेसमधील बंडखोराला उमेदवारी दिली, ती बंडखोर आमदारांची मते मिळणार या खात्रीमुळेच! काँग्रेसमध्ये ज्या प्रकारे फूट पडली होती ती पाहता 14 मतांची बेगमी सहज होऊ शकेल, अशी भाजपची अटकळ होती. या 14 मतांमुळे पटेल पराभूत होऊ शकणार होते.

अहमद पटेलांना पराभूत करून आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा भाजपचा बेत होता. हीच खेळी डोक्यात ठेवून भाजपने चौथा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला होता.

शंकरसिंह वाघेला काँग्रेसच्या आमदारांनी दिलेले राजीनामे आणि भाजपमध्ये केलेला प्रवेश, या घटनाक्रमामुळे काँग्रेसचा किल्ला उद्ध्वस्त होत असून आमदार विखुरले जात आहेत, अशी वातावरणनिर्मिती झाली होती.

आताही अहमद पटेलांना ज्याअर्थी 44 मते मिळाली, याचा अर्थ काँग्रेसच्या सर्व 51 आमदारांनी पटेलांना मत दिलेले नाही. विशेष म्हणजे, काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक, संयुक्त जनता दलाचे एक आणि भाजपमधील एका बंडखोराचे मतही समाविष्ट आहे.

काँग्रेसची दोन मते बाद ठरली आहेत आणि उरलेली तब्बल 8 मते राजपूत यांच्या खात्यात जमा झाल्याचे दिसले आहे. याचाच अर्थ, अहमद पटेल निवडणूक जिंकले असले, तरी काँग्रेसची चिंता कमी झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यातील घडामोडींकडे बारकाईने पाहावे लागेल.काँग्रेसला आपल्या 44 आमदारांना कर्नाटकातील बंगळुरू येथे एका आलिशान रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते.

ही अगतिकता का निर्माण झाली, याचा विचार काँग्रेस श्रेष्ठींनी करणे गरजेचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकसंध ठेवणे हे केवढे मोठे आव्हान आहे, हे काँग्रेस श्रेष्ठींनी ओळखले असावे.

केवळ भाजपवर दोषारोप करून काँग्रेस पक्षात चाललेल्या पडझडीकडे नेत्यांना दुर्लक्ष करता येणार नाही. शंकरसिंह वाघेलांनी अखेर बंडखोरी का केली? त्यांच्या समर्थक आमदारांनी पक्ष का सोडला? काँग्रेसचे नेते आणि आमदार भाजपच्या गोटात का जात आहेत? हे सर्व प्रश्न काँग्रेस नेतृत्वाने स्वतःला विचारायला हवेत.

या प्रश्नांवर प्रामाणिकपणे विचार केला तरच उत्तर सापडेल. गुजरातची विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना काँग्रेस श्रेष्ठी या प्रश्नावर काय चिंतन करतात आणि कोणता उपाय शोधतात, हे पाहायला हवे.

गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे घडले, ते केवळ पक्षीय चौकटीत पाहणे चुकीचे ठरेल. व्यापक पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे पाहायला हवे. या घटना आपल्या देशातील लोकशाहीची दारुण अवस्था दर्शवितात आणि त्यावर चिंताजनक भाष्यही करतात.

कोणताही पक्ष या रोगापासून अलिप्त राहिलेला नाही. भाजपची स्थिती मजबूत आहे, असे म्हटले तरी पाटीदार आंदोलनाच्या संदर्भात भाजपचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचा बहाणा करून या पक्षाच्या एका आमदाराने काँग्रेस आमदाराला मत दिले.

ज्यांना दहा दिवस रिसॉर्टमध्ये ठेवले, त्या सर्वच आमदारांनी काँग्रेसला साथ दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पक्षादेश असूनही एकसंध राहिले नाहीत.

संयुक्त जनता दलाच्या बाबतीतही हेच घडले. अहमद पटेल यांना मिळालेले 44 वे मत कुणाचे, हा विषय चर्चेत आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाला त्या मतावर ‘मालकी’ आपलीच असल्याचे सांगावे लागले. या दोन्ही पक्षांचे मिळून एकच मत कसे असेल?

 

LEAVE A REPLY

*