समाधान घोडके यांनी पटकावली मानाची गदा

0

कर्मवीर स्व. शंकरराव काळे जयंतीनिमित्त कोळपेवाडीत कुस्ती स्पर्धा

कोपरगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कोळपेवाडी येथे स्व. कर्मवीर शंकराव काळे यांच्या 96 व्या जयंतीनिमीत्त बजरंग कुस्ती केंद्राच्यावतीने कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील मानाच्या कुस्तीची लढत युवा नेते आशुतोष काळे व पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व हरियाणा केसरी अशोक कुमार यांच्यामध्ये लावली. यामध्ये महाराष्ट्र केसरी समाधान घोडकेने सात मिनिटांत फ्रंट सालतो या डावावर हरियाणा केसरी अशोक कुमारला धोबी पछाड देत त्याची पाठ जमिनीवर लोळवून कुस्ती स्पर्धेच्या सर्वोच्च बक्षिसाचा मानकरी ठरला.
युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांना रोख एक लाख रुपये व मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.
कोळपेवाडी बाजारतळावर युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या कुस्ती स्पर्धेत तांबड्या मातीवर पुरुषांच्या तसेच महिलांच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या. यामध्ये 51 हजार रुपयांची कुस्ती आकाश कावरे, 31 हजार विश्‍वंभर खैरे, किरण मसोडे, 21 हजार उमेश पवार, धर्मा शिंदे व महिला कुस्ती स्पर्धेमध्ये श्रुती रजपूत तसेच 11 हजार रुपयांचे बक्षिसे सागर नाईकवाडे, सागर कोळपे व विवेक थोरात यांनी पटकाविली.
या स्पर्धेचे समालोचन पैलवान शंकर अण्णा पुजारी व सचिन कोळपे यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन रोहमारे, संचालक सूर्यभान कोळपे, अरुण चंद्रे, सरपंच सौ. चंद्रभागा कोळपे, उपसरपंच सौ. सुलोचना कोळपे, राधुजी कोळपे, कचरू कोळपे, सुंदरराव काळे, प्रल्हाद काळे, बाबासाहेब कोळपे, डॉ. प्रकाश कोळपे, निवृत्ती कोळपे, वसंतराव कोळपे, जनार्दन कोळपे, हौशीराम कोळपे, विलास कोळपे, सागर कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्यात प्रथमच पार पडलेल्या या कुस्ती स्पर्धेचे पंच म्हणून मोहन लकडे, विजय लोणारे, भरत नाईकल, राजू लोणारे यांनी काम पहिले. यावेळी कोळपेवाडी परिसर व पंचक्रोशीतील कुस्ती शौकिनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कुस्ती स्पर्धा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस खात्याने उत्कृष्ट नियोजन केले होते.

 

LEAVE A REPLY

*