साईबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष बबन भोसले यास अटक, सहा दिवसांची पोलीस कोठडी

0

संगमनेर (प्रतिनिधी)-तालुक्यातील बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष बबन राजाराम भोसले यास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी भोसले यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 9 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण पतसंस्थेमधील सभासद व ठेवीदारांना त्यांच्या मुदत ठेवीच्या रकमा मिळत नसल्यामुळे सदर संस्थेच्या संचालक मंडळाकडे ठेवीदारांनी रकमेसाठी तगादा सुरु केला. त्यानंतर संस्थेत आर्थिक घोटाळा झाल्याचे पुढे आले. लेखापरिक्षक संतोष पंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संस्थेचे व्यवस्थापक रावसाहेब कारभारी टेकुडे (रा. काळेवाडी) व रोखपाल सिताराम मनोहर शेंडगे (रा. मांडवे बुद्रूक) यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येवून सदर दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर देखील ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे ठेवीदार भिमराज जाधव व इतर ठेवीदारांनी सहकारी संस्थेचे उपनिबंधक यांना निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला. सदर निवेदनात म्हटले होते की, पतसंस्थेचे अध्यक्ष बबन राजाराम भोसले यांनी ठेवीदारांचा विश्‍वासघात करुन घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे भोसले यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. संस्थेमधून आर्थिक रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष बबन भोसले यास पोलिसांनी सहआरोपी करत अटक केली. काल गुरुवारी बबन भोसले यास संगमनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 9 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

असा झाला घोटाळा
साईबाबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत व्यवस्थापक, रोखपाल, अध्यक्ष यांनी संगनमताने अधिकाराचा दुरुपयोग करुन संस्थेची 2 कोटी 16 लाख 61 हजार 916 रुपयांची रोख रक्कम काही पावत्यांवर, चेकवर खोट्या सह्या करुन संस्थेच्या जमा झालेल्या रोख रकमा व ठेवी बँकेमध्ये भरणा न करता तसेच संस्थेचे खाते असलेल्या वेगवेगळ्या बँकेतून संस्थेच्या डे बुकला नोंदी न करता व जिल्हा बँक शाखा साकुर येथील लॉकरमध्ये ठेवलेले संस्थेचे सोन्याचे दागिणे परस्पर काढून घेवून स्वतःचे फायद्याकरीता वापरुन अपहार केला.

LEAVE A REPLY

*