शिर्डीत साई समाधीवरील काचा हटविल्या

0

हॉस्पिटलच्या मशिनरी न बदल्यास विश्‍वस्तांना काळे फसण्याचा ग्रामस्थांचा इशारा

शिर्डी (प्रतिनिधी) – साई समाधीला काचा लावून भक्तांच्या दर्शनाला आडसर आणणार्‍या साईबाबा संस्थान प्रशासनाचा निषेध नोंदवत शिर्डीच्या गावकर्‍यांनी मंदिरात जाऊन समाधीच्या काचा काढल्या. तर संस्थानच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील बंद पडलेले सोनोग्राफी व सिटीस्कॅन, एमआरआय, मशीनला हार घालून गांधीगिरी केली. 15 दिवसांत नवीन मशिनरी न बसविल्यास संस्थानच्या अध्यक्षांसह विश्‍वस्तांना काळे फासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकर्‍यांनी यावेळी दिला.

गत पंधरवड्यात शिर्डी ग्रामस्थांनी साईसंस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांची भेट घेऊन व्हीआयपी भक्तांना काच काढून दर्शन दिले जाते. मग सर्वसामान्य भक्तांच्या दर्शनाला समाधीवर काच का? असा सवाल करत यापुढे सर्वांना काचकाढून दर्शन द्या अशी मागणी केली. याला डॉ. हावरे यांनी मान्यता दिली. तसेच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची नियुक्ती, बंद पडलेल्या मशिनरी बदलून देण्याचे मान्य केले.

मात्र 15 दिवस उलटवूनही ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन संस्थान प्रशासनाने समाधीच्या काचा काढल्या नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संस्थान प्रशासनाचा निषेध करत मोर्चाने साई मंदिरात जाऊन समाधीच्या काचा काढल्या. या काचा प्रशासकीय इमारतीजवळ आणून ठिय्या आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध नोंदविला. त्यानंतर हॉस्पिटलकडे मोर्चा वळवत हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशिन, एमआरआय व सोनोग्राफीच्या बंद पडलेल्या मशिनला पुष्पहार अर्पण करुन आरती करण्यात आली.

यावेळी खा. सदाशिव लोखंडे, कैलास कोते, कमलाकर कोते, विजय कोते, नितीन कोते, अभय शेळके, मंगेश त्रिभुवन, सचिन चौगुले यांनी साईबाबा संस्थान व हॉस्पिटल प्रशासनावर टिकेची झोड उठवत यापुढे साईभक्त व रुग्णांना त्रास झाल्यास प्रशासनाला माफ करणार नाही. आश्‍वासने नको आता कृती करा. येत्या 15 दिवसांत हॉस्पिटलची सर्व जुनी मशिनरी बदलून नव्या मशिनरी खरेदी करा. सोनोग्राफी मशिन आठवड्यातून 2 दिवस सुरु असते. त्यावर स्वतंत्र डॉक्टर नेमून ते 24 तास सुरु ठेवावे.

हे न केल्यास संस्थानच्या अध्यक्षांसह विश्‍वस्तांना काळे फासून रुग्णांसह रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. यावेळी ज्ञानेश्‍वर आबा गोंदकर, भानुदास गोंदकर, नगरसेवक दत्तू कोते, हरिश्‍चंद्र कोते, अरविंद कोते, हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. नरोडे, डॉ. प्रितम वाडगावकर, शहरप्रमुख सचिन कोते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मी ग्रामस्थांबरोबरचः खा. लोखंडे
शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे ग्रामस्थांच्या आंदोलनात सहभागी झाले. सत्तेत असूनही तुम्ही आंदोलनात असा सवाल उपस्थित केला असता मी मंदिरात राजकारण आणणार नाही. मात्र संस्थान प्रशासनाने साईभक्तांना येणार्‍या अडचणी सोडवाव्या. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची नेमणूक करावी. साईबाबाच्या आचार विचाराला काळे फासण्याचा प्रयत्न विश्‍वस्त मंडळाकडून होत आहे. हा साईभक्तांवर अन्याय आहे. मी शिर्डीचा मतदार असून स्थानिक प्रश्‍नावर मी ग्रामस्थांबरोबर आहे.

LEAVE A REPLY

*