त्र्यंबकराजाच्या नगरीत निळ्या फळांनी बहरला रुद्राक्ष वृक्ष

0

त्र्यंबकेश्वर (मोहन देवरे) दि. २९ : त्र्यंबकेश्वर परिसरातील रुद्राक्ष वृक्ष सध्या निळसर हिरवट फळांनी बहरला असून परिसरात आकर्षणाचा विषय बनला आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरात रुद्राक्षाला काहीसे पोषक वातावरण असल्याने येथे हा वृक्ष चांगला रुजला आहे. येथे रुद्राक्षाचे असे दोन वृक्ष आहेत. त्यापैकी एक २० वर्षांपूर्वीचा असून एक ४० वर्षांपूर्वीचा आहे.

येथील जोगळेकर वाड्यात पेशवेकाळात रुद्राक्ष लावल्याचे सांगितले जाते. तसेच काहीजण नागा साधूंनी रुद्राक्षाची लागवड केल्याचे सांगतात.

अलिकडच्या काळात त्र्यंबकेश्वर येथून अनेक जण हिमाचल, नेपालमध्ये गेल्यानंतर तिथून रुद्राक्षाची रोपे आणतात व वाढवून विक्री करतात. मात्र ही रोपे सगळीकडे रुजतातच असे नाही.

पूर्ण पिकल्यानंतर रुद्राक्ष हे निळ्या रंगाचे फळ दिसते. रुद्राक्षाचे झाड हे सदाहरित प्रकारात मोडणारे असते. लागवडीपासून तीन ते चार वर्षांतच फळधारणा होते.

भारतात गंगेचे खोरे, हिमाचल प्रदेश येथे मुख्यत: रुद्राक्षाचा आढळ आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, हवेई, न्यू जिनिया या .ठिकाणीही रुद्राक्ष आढळतो. दहाव्या शतकापासून औषधी उपयोगासह जपमाळ व इतर अध्यात्मिक उपयोगासाठी रुद्राक्षाचा भारतात वापर होतो.

रुद्राक्षाचे एकमुखी, द्विमुखी, पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी इत्यादी प्रकार आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तीने रुद्राक्ष उगाळून ते चाटण मधासोबत सेवन करावे. रुद्राक्षाचे फळ हे शिवाच्या अश्रूपासून निर्माण झाले आहे असे मानले जाते.

हे फळ एक दिव्य मणी असून त्याची पूजा केल्याने साक्षात शिवपूजेचे फळ मिळते. शिवलीलामृतामध्ये असे सांगितले आहे की सहस्र रुद्राक्षे धारण करणारा साक्षात शिव आहे.

त्याचप्रमाणे १६ रुद्राक्षे दंडाभोवती बांधावीत, कपाळाला १ बांधावा, मनगटाभोवती १२, कंठाभोवती ३२, कानामध्ये ६, व अन्यत्र ७ अशा प्रकारे एकूण १०८ रुद्राक्षे धारण करावीत, असेही पुराणांमध्ये सांगितले जाते.

दरम्यान, विविध प्रकारच्या तुळस, कमलबीज, बेल यासारख्या औषधी आणि पूजेसाठी उपयुक्त असणाऱ्या 27 नक्षत्र वनस्पतीची लागवड शासनाकडून करण्यात यावी, अशी मागणी अष्टकोशाल महंत  देवराज पुरी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*