10 हजारांची उचल शेतकर्‍यांना तात्काळ द्यावी : जिल्हा बँकेला आदेश प्राप्त

0

शेतकरी संघटनेचा आक्षेप, मंत्र्यांशी केली चर्चा,जिल्हा बँकेच्या संचालकांची आज बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी) – पेरणीसाठी तातडीने 10 हजाराच्या कर्जवाटपापोटी देण्यात येणार्‍या उचलीसंदर्भात अडथळे दूर झाले असून कर्ज वाटप सुरू करण्याचे आदेश आजच जिल्हा बँकेस प्राप्त झाले आहेत. त्यात गरजूंनाच कर्ज मिळेल याची कठोर निकषातून खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
10 हजार रुपयांचं कर्ज मिळवण्याच्या परिपत्रकात म्हटले की, सर्व जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांनी 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या सर्व शेतकर्‍यांना खरिपासाठी 10 हजार रुपयांचे तातडीचे

कर्ज उपलब्ध करुन द्यावे. या कर्जाची हमी राज्य सरकार घेईल. शासन हमीच्या आधारावर संबंधित बँकांनी अशा शेतकर्‍यांचे स्वतंत्र खाते उघडावे आणि शेतकर्‍यांना 10 हजार रुपयांपर्यंत वाटप केलेले पीककर्ज संबंधित बँकांनी‘सरकारकडून कर्जमाफी 2017 पोटी रक्कम येणे बाकी’, असं दर्शवावे.

तारीख व जि. प. सदस्य, नगरसेवकांबाबत
शेतकरी संघटनेचा आक्षेप, मंत्र्यांशी चर्चा
थकबाकीदारीची तारीख व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सदस्य,बँकांचे संचालक तसेच नगरसेवकांबाबत शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व ना. सुभाष देशमुख यांची भेट घेऊन आक्षेप नोंदविला.

या परिपत्रकात 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्यांना 10 हजारांची उचल तातडीने द्यावी असे नमूद केलेले आहे. पण 11 जूनपासून कर्जमाफ केल्याची घोषणा सरकारने केली आहे. मग तारखेत बदल कसा केला गेला असा सवाल शेतकरी संघटनेकडून करण्यात आला.

तसेच या परिपत्रकात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सदस्य, नगरसेवक याचा लाभ घेण्यास अपात्र असल्याचे नमूद केले आहे. पण यात 50 टक्के आरक्षण असून अनेक महिला आहेतं तसेच अनेक सदस्य हे अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमातींचे असतात. ते गरीब असतात. ही बाब कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ना. फुंडकर यांनी आपण याबाबत सहकारमंत्री व मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढू असे आश्‍वासन दिले.

या शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे नेते व सुकाणू समितीचे नेते रघुनाथदादा पाटील, सदस्य कालिदास आपेट, युवा संघटनेचे बाळासाहेब पटारे, अ‍ॅड. सचन धांडे, हनुमंत चाटे, मुंबईचे गणेश घुगे आदी उपस्थित होते.

जिल्हा बँकेची आज बैठक
शेतकर्‍यांच्या खरीप हंगामासाठी 10 हजार रूपये मयादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याबाबतचे परिपत्रक जिल्हा बँकेस प्राप्त झाले असून याबाबत आज शुक्रवार दि.16 जून रोजी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात यासंदर्भात विचार विनिमय केला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली. 

जि.प., पं.स.सदस्य, नगरसेवक, शिक्षक, डॉक्टर,
नोकरदार, बँकांच्या संचालकांना कर्ज नाही
आजीमाजी मंत्री, आजीमाजी आमदार, आजीमाजी खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती, करदाते, डॉक्टर, वकील, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी दूध संघ यांचे संचालक आणि या संस्थांचे अधिकारी, कामगार, केंद्र व राज्य शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, अनुदानित महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, चार्टर्ड व कास्ट अकाउंटंट, अभियंता, शासकीय कंत्राटदार, मजूर सहकारी संस्थांचे अध्यक्ष, ज्यांच्या नावावर चारचाकी वाहन नोंदणीकृत असेल अशी व्यक्ती यांना हे कर्ज मिळणार नाही.

 

LEAVE A REPLY

*