शेतकऱ्यांना अपशब्द वापरला नाही; तो संवाद कार्यकर्त्यांशी : खा. दानवे

0

मुंबई, ता. १२: जालना येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत एका कार्यकर्त्याशी मी बोलत होतो. शेतकऱ्यांबद्दल कुठलाही अपशब्द वापरलेला नाही.

मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याच्या व्यथा जाणतो,  असा खुलासा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी जालना येथील बैठकीत कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादाची ध्वनिचित्रफित काही न्यूज चॅनेल्सनी प्रसिद्ध केल्यानंतर खा. दानवे यांच्यावर विरोधकांसह सर्वच प्रकारच्या माध्यमांतून टिकेची राळ उठली होती.

त्यानंतर लगेचच त्यांनी काल त्यांनी स्वत:च्या स्वाक्षरीनिशी हा खुलासा प्रसिद्ध केला आहे. या पत्रात खा. दानवे यांनी म्हटले आहे की, ‘ दिनांक १० मे २०१७ रोजी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक जालना भाजपा कार्यालयात बोलावण्यात आली होती.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने पं.दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंती वर्षानिमित्त एक वर्ष, सहा महिने व पंधरा दिवस असे विस्तारक, ज्यांनी दिलेल्या दिवसांचा संपूर्ण वेळ पक्षासाठी द्यायचा, यांची बैठक होती.

या बैठकीमध्ये ग्रामीण भागात जाऊन शेतक-यांशी संवाद साधणे व तो शेतात जाऊन साधणे, अशा प्रकारची चर्चा झाली.

यासाठी बैठकीमध्ये तीन वर्षांची केंद्र सरकारची कामगिरी व अडीच वर्षाची राज्य सरकारची कामगिरी हेच विषय बैठकीत करावे अशा सूचना दिल्या होत्या.परंतु एका कार्यकर्त्याकडून तुरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

त्यावर तुरीच्या संदर्भात सरकारची भूमिका मी त्यांना समजावून सांगितली आणि पुन्हा केंद्र शासनाने एक लाख टन तूर खरेदीसाठी मान्यता दिल्याचे सांगितले. हे कार्यकर्त्याना समजावून सांगितले.

अशामध्ये माझा आणि कार्यकर्त्यांचा हा संवाद आहे. यामध्ये मी शेतक-यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही.

मी स्वतः शेतक-याच्या पोटी जन्म घेतला आहे. शेतक-यांचे दु:ख मला माहिती आहे. शेतक-यांची बाजू घेत सतत ३५ वर्ष मी राजकारणात आहे.

त्यामुळे मी शेतक-यांबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नाही. माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतक-यांशी जोडू नये. परंतु यावरही शेतक-यांची मनं दुखावली गेली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

दरम्यान दानवेंच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला असून विरोधकांनी या प्रकाराला चालना दिली, असे मनोगत भाजपा कार्यकर्त्यांनी खासगीत व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

*