देवळालीच्या सुनीता थोरात यांचा आरोग्य सभापतीपदाचा राजीनामा

0

भाजपाला घरचा आहेर; नगरसेविकेने हुकूमशाहीला तोंड फोडले

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – देवळाली प्रवरा नगर पालिकेचा कारभार माजी आमदार व शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम व नगराध्यक्ष सत्यजीत कदम हे एकाधिकारशाहीने करीत आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना बोलण्याचा अधिकार नाही, स्वतंत्र काम करण्याची संधी नाही. या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन आरोग्य समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा देऊन नगरसेविका म्हणून स्वतंत्र काम करणार असल्याची माहिती नगरसेविका सुनीता सुरेंद्र थोरात यांनी दिली. दरम्यान, थोरात यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला ‘घरचा आहेर’ मिळाला असल्याची चर्चा होत आहे.

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याकडे काल सोमवारी (दि. 07) सकाळी नगरसेविका सुनीता थोरात यांनी सभापतीपदाचा राजीनामा सुपूर्त केला.राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सौ.थोरात यांनी कदम पिता-पुत्रांच्या पालिकेतील कारभाराचे चांगलेच वाभाडे काढल्याने देवळालीसह तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून सत्ताधारी नगरसेवकही थोरात यांच्या राजीनाम्यामुळे सावध पवित्रा घेतल्याची चर्चा आहे.
सौ. थोरात म्हणाल्या, नगराध्यक्षांचा मनमानी कारभार निवडणूक होऊन नऊ महिने झाले तरीही सुरूच आहे. माझ्या प्रभागात विकासकामे झाली नाहीत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनेक विकासकामे सुचविली असून त्याकडे पक्षश्रेष्ठी व नगराध्यक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. नगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी माजी आ. चंद्रशेखर कदम यांच्या कार्यालयात बैठक घेऊन नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत काय करायचे? याचे धडे दिले जातात. कोणत्याही नगरसेवकाला माजी आ. कदम यांच्यासमोर व सर्वसाधारण सभेत बोलण्याचा अधिकार नाही. एकाधिकारशाहीमुळे नगरसेवकांना आपल्या प्रभागात कोणती विकासकामे पाहिजेत? हेही सांगण्याचे धाडस नाही.
सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना फक्त इतिवृत्तावर सह्या करण्याचा अधिकार ठेवला आहे. त्यामुळे भाजपाच्या सत्ताकाळात नगरसेवक ‘सह्याजीराव’ झाले आहेत. ज्या नागरिकांच्या मतांवर नगरसेवक निवडून आले आहेत, त्या नागरिकांची कामे करण्याचा अधिकार नगरसेवकांना राहिलेला नाही. आरपीआय व भाजपा यांची वरिष्ठ पातळीवर युती असल्याने त्यांच्याबरोबर आम्ही निवडणूक लढलो.
आमच्या मागासवर्गीयांच्या मतांमुळे नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाला 5 हजार ते 6 हजार मतांचा फायदा झाला. आम्ही सत्ताधारी आहोत, असे सर्व नागरिकांना वाटत असले तरी आमचा एकही शब्द सत्ताधारी ऐकत नसल्याने नागरिकांची विकासकामे आमच्याकडून होत नाहीत. नागरिकांचा विश्‍वासघात करण्यापेक्षा आरोग्य सभापतीपदाचा राजीनामा देऊन हा सर्व प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आणून देत असल्याचे सौ.थोरात यांनी स्पष्ट केले.
सौ.थोरात यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मागील पंचवार्षिक निवडणुकीत सत्तेत नसतानाही मी सुचविलेले विकासकामे झाली. परंतु या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी एकहाती सत्ता आमच्या ताब्यात दिली. आम्ही सत्तेत असूनही आम्ही सुचविलेली विकासकामे जाणीवपूर्वक टाळली जातात. त्यामुळे नागरिकांच्या विश्‍वासार्हतेला तडा जाण्यापेक्षा आरोग्य सभापतीपदाचा राजीनामा देऊन आमच्या सहकारी सत्ताधार्‍यांना चपराक बसावी व सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन काम करावे, यापुढील काळात आरपीआय गट भाजपासोबत काम करणार नाही.
निवडणूककाळात मी स्वतः नगराध्यक्षपदासाठी प्रत्येक प्रभागात सभा घेतल्या. त्यामुळे मागासवर्गीयांच्या पाच ते सहा हजार मतांचा फायदा नगराध्यक्षांच्या पदरात पडला. मात्र, नगराध्यक्षांना त्याची जाणीव राहिलेली नाही, अशी खंत थोरात यांनी व्यक्त केली. नगराध्यक्ष सत्यजीत कदम व चंद्रशेखर कदम यांनी एकाधिकारशाहीने कारभार चालविला आहे. सत्ताधारी नगरसेवकांमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून घुसमट चालू आहे. या घुसमटीला आरपीआय व विद्यमान नगरसेविका सौ.थोरात यांनी तोंड फोडले आहे.
यापुढील काळात सत्तेतील काही नगरसेवक असाच निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत आहेत, असे काही नगरसेवक माझ्याजवळ वैयक्तिकरित्या बोललेले आहेत. यापुढील काळात मी व माझी पत्नी स्वतंत्र काम करणार असून ज्या नगरपालिकेत नगरसेवकांना बोलण्याचा अधिकार नाही, त्यात नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेले खाते माझ्या पत्नीकडे असल्याने व नागरिकांची कामे होत नसल्याने मी स्वतः माझ्या पत्नीला आरोग्य सभापतीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. राजीनाम्यानंतर सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सभापतीपदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याने राजीनामा मागे घेण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सौ. थोरात यांनी आरोग्य सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. तो राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून निर्णय घेतला जाईल, असे गांगोडे यांनी सांगीतले.

कुणाच्या स्वार्थासाठी मी निर्णय घेणार नाही  –    मी पालिकेच्या कामासाठी मुंबईला आलो आहे. मला याबद्दल काही माहिती नाही. सुनीता थोरात या भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत. पार्टी म्हणून त्या भाजपाच्या आहेत. मी जरी नगराध्यक्ष असलो तरी पार्टी म्हणून मी लोकहिताचे निर्णय घेतो, कुणाच्या वैयक्तीक स्वार्थासाठी मी निर्णय घेणार नाही. त्यासाठी मला राजीनामा देण्याची वेळ आली तरी चालेल. थोरात यांच्यासह भाजपाचे सोळा नगरसेवक आहेत. त्यांच्या आरोग्य समितीच्या सभापतीपदाच्या राजीनाम्याबाबत माझ्याशी चर्चा झालेली नाही. त्या भाजपाच्या नगरसेविका असल्याने याबाबत पार्टी काय तो निर्णय घेईल. – सत्यजीत कदम, नगराध्यक्ष

सुनीता थोरातांचा आरोप खोटा – 
सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष व पक्षश्रेष्ठींच्या कामावर समाधानी आहेत. आम्ही सोळा नगरसेवक भाजपाच्या पक्षचिन्हावर निवडून आलो आहोत. सौ.थोरात यांचा गैरसमज दूर करण्यात येईल. जर त्यांच्या प्रभागात कामे होत नसतील तर त्यांनी नगराध्यक्षांकडे तशी तक्रार करायला पाहिजे. प्रत्येक प्रभागातील खराब रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. नगराध्यक्ष पालिकेच्या कामासाठी मुंबईला गेले आहेत. ते आल्यानंतरच याबाबत सविस्तर चर्चा होईल. सर्वसाधारण सभेच्या अगोदर नगरसेवकांची बैठक घेणे, ही पक्षाची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे ती घेतली जाते. नगरसेवकांना विश्‍वासात घेतले जात नाही, हा आरोप खोटा आहे.
सचिन ढूस, गटनेते
प्रकाश संसारे, उपनगराध्यक्ष
आदिनाथ कराळे, नगरसेवक.

LEAVE A REPLY

*