रेशन दुकानदारांच्या संपात फूट; निम्मे दुकानदार संपातून बाहेर; पुरवठा विभागाच्या नोटिसा

0

नाशिक । तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात अन्नधान्य महामंडळ स्थापन करावे व रेशन दुकानदारांना दरमहा 40 हजार रुपये मानधन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्य रेशन दुकानदार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपातून नाशिक जिल्ह्यातील निम्मे रेशन दुकानदार बाहेर पडले असून, त्यामुळे रेशन दुकानदारांच्या संपात फूट पडल्याचे दिसून येते.

यापूर्वी शहरासह काही तालुक्यातील रेशन दुकानदारांनी संपात सहभागी नसल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाल देत संपात माघार घेतली होती. आता संपात सहभागी असलेल्या काही रेशन दुकानदारांनी माघार घेत चलने फाडल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांच्याबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र संपात सहभागी असलेल्या रेशन दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी दिली.

राज्यातील रेशन दुकानदारांनी 1 ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला असला तरी, नाशिक शहरातील सुमारे दोनशेहून अधिक दुकानदारांनी सरकारसोबत सकारात्मक चर्चेतून मार्ग निघण्याची अपेक्षा व्यक्त करून संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी संप यशस्वी करण्याचा चंग बांधला होता व त्यादृष्टीने गावोगावी बैठका घेऊन वातावरण निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार संप सुरू होऊन आता पाच दिवस लोटले असून, सरकारकडून अद्याप त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. रविवार व सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाला सुटी असल्यामुळे मंगळवारनंतरच संपावर तोडगा निघू शकतो हे स्पष्ट झाल्यामुळे रेशन दुकानदारांचा धीर सुटत चालला आहे.

याकरीता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 8 व 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेशन दुकानदार आंदोलन करणार आहेत. जिल्ह्यात 2609 रेशन दुकानदार असून, त्यापैकी 1506 दुकानदार संपात सहभागी झाले असून, नाशिक, सिन्नर, नांदगाव, मालेगाव, बागलाण या तालुक्यातील दुकाने पूर्ववत सुरू झाले आहेत.

येत्या दोन दिवसांत आणखी काही दुकानदार संपातून बाहेर पडण्याची शक्यता गृहीत धरून पुरवठा खात्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सबुरीची भूमिका घेतली आहे, तर काही दुकानदारांनी कारवाईच्या भीतीपोटी संपातून माघार घेतली आहे.

LEAVE A REPLY

*