नाशिकच्या शेतकऱ्यांनी खा. दानवेंना विचारले, ‘साहेब मुलाच्या लग्नाचा खर्च किती आला?

शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याचे आश्वासन

0

ढकांबे, ता. २६ : शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालीच पाहिजे याविषयी भारतीय जनता पक्षाचे वेगळे धोरण नसून त्यास आमचा विरोध नाही. परंतु योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवार सभेत ते बोलत होते.

यावेळी भाजप प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, गोविंद केंद्रे , खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे जिल्हा अध्यक्ष दादाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस बापूसाहेब पाटील , नाशिक जिल्हा यूवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर भाऊ चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आपल्या समस्या व सरकार कडून काय अपेक्षित आहे याबाबत प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या सांगितल्या.

यामध्ये शेती औषधे व बियाणांची एम. आर. पी. दर निश्चित करावे.  तसेच जिल्हा बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांची कष्टाची रक्कम असुन त्याला त्याचीच रक्कम काढणे जिकिरीचे झाले असल्याने तो अडचणीत सापडला असल्याने जिल्हा बँकेच्या व्यवहार सुरू करावा. प्रत्येक शेतकऱ्याने कर्जमाफी मिळावी  आदी  मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.

शेतकऱ्यांनी समस्याबरोबरच सरकारने काय करणे अपेक्षित आहे हे ही सांगितले जावे असे खा. दानवेंनी विचारल्यावर शेतकरी जरा बुचकळ्यातच पडले. काहींनी तर न बोलणेच पसंत केले. कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी देणेही पसंत करीत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याची व्यथा एका शेतकऱ्याने मांडली. तसेच कर्जमाफी देताना सरसकट कर्जमाफी द्यावी अशीही मागणी करण्यात आली.

त्यावर विरोधकांच्या मागण्यांपेक्षा शेतकऱ्यांची खरी समस्या काय आहे? त्याचे मत काय आहे याविषयीचे मत जाणून घेण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर सभा घेत आहोत. तसेच औषध व बियाणे यांच्या एम. आर. पी. बाबत तसेच जिल्हा बँकेच्या व्यवहाराविषयी योग्य तो निर्णय लवकरच घेण्याबाबत मुख्यमंञी महोदयांना कळविण्यात येईल असे आश्वासन खा. दानवे यांनी दिले.

साहेब मुलाच्या लग्नाचा खर्च किती आला?

शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सांगताना एका शेतकऱ्याने आमच्या मुलांना लग्नासाठी कोणी मुलगीही देणे पसंत करीत नाहीत साहेब अशी परिस्थिती आमची झाली असल्याची व्यथा मांडली.

त्यानंतर लगेचच खतवड येथील शेतकरी सुरेश जाधव यांनी, ‘साहेब मी भाजपचाच कार्यकर्ता असून मी प्रत्येक वेळी भाजपलाच मतदान करत,  पण साहेब आपण आपल्या मुलाच्या लग्नासाठी किती खर्च केला? असा प्रश्न खा. रावसाहेब दानवे यांना विचारताच उपस्थितांत एकच हशा पिकला. यावर उत्तरादाखल खा. दानवेंनी स्मितहास्य करणेच पसंत केले.

LEAVE A REPLY

*