Thursday, April 25, 2024
Homeनगरपरमार्थात दिखावा टिकत नसतो- रामगिरी महाराज

परमार्थात दिखावा टिकत नसतो- रामगिरी महाराज

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

परमार्थात वर वरचा दिखावा टिकत नसतो, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले.

- Advertisement -

श्री श्रेत्र सराला बेटावर आषाढी एकादशी निमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात महंत रामगिरी महाराजांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्यासाठी वैजापूरचे आ. प्रा. रमेश बोरणारे, शाबीरभाई, श्रीरामपूरचे नारायण डावखर, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, गंगापूरचे उपनगराध्यक्ष भैय्या पाटील, वैजापूरचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, मधुकर महाराज, चंद्रकांत सावंत महाराज, बाळासाहेब रंजाळे महाराज, दादासाहेब रंजाळे महाराज, नवनाथ महाराज आंधळे आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज यांचा भक्ति कठीण सुळावरील पोळी। निवडे तो बळी विरळा शुर॥ हा अभंग निरुपणास घेत महंत रामगिरी महाराज यांनी त्यावर किर्तन केले. त्यावर महंत रामगिरी महाराज म्हणाले, जगदगुरु तुकाराम महाराजांनी काही ठिकाणी सोपी तर काही ठिकाणी भक्ती, परमार्थ अवघड सांगितलेला आहे. कलियुगात साधना कळत नाही, म्हणून भक्तीपंथ सोपा आहे, कर्म मार्गातील, ज्ञान मार्गातील, योग मार्गातील अडथळे सांगितले.

परमार्थ जरी सार्वजनिक रित्या करता आला नाही तरी तो एकांतात करावा. परमार्थ हाच जिवनाचा सार आहे. परमार्थ करतांना लांबून काही गोष्टी सोप्या दिसतात परंतु जवळ गेल्यावर एवढा सोपा नाही. इमारत उभारली मात्र पाया कच्चा राहिला तर इमारत टिकेल का हो? तसे परमार्थात तुम्ही जर दिखावा करत असाल तो परमार्थ टिकेल का हो? टिकणार नाही. असे सांगत महाराजांनी विविध दाखले देत प्रसंग उभे केले.

सप्ताह बेटावरच !

श्री सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज यांचा 174 वा अखंड हरिनाम सप्ताह करोनाच्या पार्श्वभुमीवर यंदाही सराला बेटावरच प्रशासनाच्या परवानगीने अल्प भाविकांत करण्यात येणार आहे. सर्वांना या सप्ताहाला येता येणार नाही, त्यामुळे त्या कालावधीत भजन घरुनच करावे, जे काही थोडके येतील त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, करोना चाचण्या होतील, असेही महंत रामगिरी यांनी यावेळी सांगितले.

सप्ताह समितीची स्थापना

सराला बेटावर होणार्‍या सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज 174 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष- साबेरभाई (माजी नगराध्यक्ष वैजापूर), उपाध्यक्ष-अंबादास ढोकचौळे (रांजणखोल), खजिनदार-कडूभाऊ काळे, सदस्य- अंबादास बनकर (येवला), नारायण डावखर (श्रीरामपूर), कमलाकर कोते (शिर्डी), विशाल संचेती (वैजापूर), बाळकृष्ण कापसे (येवला), भैया पाटील (गंगापूर), डॉ. दिनेश परदेशी (वैजापूर), करण ससाणे (श्रीरामपूर), बाबासाहेब चिडे (माळवाडगाव), बाबासाहेब जगताप (भऊर), अशोक बोर्‍हाडे (अस्तगावकर सराफ, राहाता), किशोर थोरात (माळेवाडी), भाऊसाहेब फुलारी (भेंडा). तर मार्गदर्शक म्हणून ना. बाळासाहेब थोरात, आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. लहु कानडे, आ. प्रा. रमेश बोरणारे यां़चा समावेश राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या