सप्ताहातून जीवनभर पुरेल एवढी उर्जा मिळते

0

महंत रामगिरी महाराज ; भाविकांचा महाकुंभ, सहाव्या दिवशी गर्दीचा उच्चांक

गंगापूर (विशेष प्रतिनिधी)- राजाला, इंद्राला जे सुख मिळणार नाही, ते सुख संत, महापुरुषांकडे, सप्ताहाच्या आमटी भाकरीत आहे. भाविकांना भक्तीरसाची तहान लागली आहे. ज्यांना तहान लागली ते सप्ताहाची आस बाळगून असतात. आणि म्हणूनच सप्ताहाला ही अलोट गर्दी आहे. जीवनभर पुरेल अशी उर्जा अखंड हरिनाम सप्ताहातून मिळते. असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंंगापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र गवळीशिवरा गावच्या शिवारात सद्गुुरू गंगागिरी महाराज 170 वा अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने श्रावणातील हिरव्यागर्द तृणांचा शालू पांघरलेल्या पवित्र भुमित भाविकांचा महाकुंभ भरला आहे. सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरीजी महाराज यांच्या रसाळ वाणीतील भक्तीरसाचे प्रवचन रुपी कुंभ ओथंबून वाहत आहेत. त्यात लाखो भाविक हा भक्तीरस श्रवण करता करता चिंब झाले आहेत.

कालच्या सहाव्या दिवशी भाविकांच्या गर्दींने उच्चांक केला. चार लाखाहून अधिक भाविकांनी काल हजेरी लावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काल या सप्ताहस्थळाकडे येणारे सर्वच रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. काही काळ मुंबई- नागपूर हायवेवरील वाहतूकही खोळंबली होती. परंतु औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या चपळाईने वाहतूक सुरळीत झाली. कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा चौफुली ते 80 किमी अंतरातील सप्ताहस्थळापर्यंत हा हायवे तुडूंब भरून वाहत होता. आमटी भाकरीचा काल शेवटचा दिवस असल्याने नगर, नाशिक तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांनी भाकरीचे ट्रक, टेम्पो तसेच छोट्या वाहानांच्या माध्यमातून भाकरी आणल्या होत्या. 800 एकरातील सप्ताहाचे मैदान काल भाविकांनी अक्षरश: फुलून गेेले होेते.

महंत रामगिरी महाराजांनी कालच्या सहाव्या दिवशीच्या प्रवचनात अंत:करणातील भक्ती, स्वप्न, संत महंतांचे महत्त्व, परमार्थ आदी विषयांना आपल्या वाणीतून स्पर्श करत महाभारत, रामायण, तसेच वास्तवातील प्रसंग, दृष्टांत भाविकांपुढे जिवंत करत मतितार्थ स्पष्ट केला. महाराज म्हणाले, भगवंतापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. बिभीषणाने भगवंतासाठी भावाचा, भरताने मातेचा त्याग केला. भगवंताच्या भक्तीसाठी मिराने संसाराचा त्याग केला. संसारात स्थिरता नसते, अध्यात्म- चिंतनात स्थिरता आहे.

ज्या मनुष्याला संसाराचे जास्त वेड असते, तो संसार चांगला करतो आणि ज्याला भगवंताचे वेड जास्त असते तो भक्ती चांगली करतो. भगवंताच्या भक्तीकरिता सर्व आसक्तीचा त्याग अपेक्षीत आहे. काहीही उद्देश नसताना भक्ती करतो तो खरा परमार्थी. अंतःकरणातील भाव जागृत केल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. व्यक्ती अंतःकरणात सज्जनता नाही परंतु ती दाखविण्याचा प्रयत्न करतो व दुर्जनता लपविण्याचा प्रयत्न करतो तेच त्याच्या दुःखाचे मूळ कारण ठरते.

काल सप्ताहास कोपरगाव बेटाचे रमेशगिरी महाराज, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा सौ. राजश्रीताई ससाणे, किरण डोणगावकर, माजी आमदार अण्णासाहेब माने, आमदार प्रशांत बंब, डॉ. धनंजय धनवटे, संतोष गोर्डे, सुरेशआबा लहारे, राजेंद्र विश्‍वासराव लहारे, रोहित साबळे, गणेशचे माजी संचालक नारायण चोळके, नामदेव जेजूरकर, दत्तु पाटील खपके, जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ,

विजय धनवटे, श्रीरामपूरच्या सौ. मंगल मुथ्था, सौ. भारती फंड, सौ. स्वाती छल्लारे, सौ. मंजू गलांडे, सौ. सुनंदा जगधने, संजिवनीचे बाळासाहेब नरवडे, ज्ञानेश्‍वर परजणे, फकिरराव बोरणारे, डुंबरे, वसंत थोरात, चंंद्रकांत गमे, सुभाष पाटील गमे, अस्तगावकरचे अशोकराव बोर्‍हाडे, मधुकर महाराज, सचिनभाऊ जगताप, सुनील महाराज कोळपकर, सागर येलम, अक्षय साबळे, अशोक शेळके, डॉ. विजय कोते यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅक्स आणि माळकरी! – 
परमार्थात जे दिसतात ते सर्वच परमार्थिक असतातच असे नाही. असे सांगत महाराजांनी एक दृष्टांत सांगितला ते म्हणाले, एका राजाकडे एक साधू आले असता, त्यांनी राजाकडे राज्यातील माळकर्‍यांचा टॅक्स माफ करण्याची मागणी केली. राजाने लगेच ज्यांच्या गळ्यात माळी आहेत त्यांचा टॅक्स माफ केला. हे समजल्यावर राज्यातील अन्य लोकांनीही माळी घातल्या. परिणाम असा झाला की, राजाला टॅक्स मिळेना. साधू फिरत पुन्हा राज्यात आला. राजाने त्याला राज्यातील सर्वच माळकरी झाल्याचे सांगितले, टॅक्स बंद झाला. मग साधूने युक्ती केली. दवंडी द्यायला लावली, की राजाची किडणी खराब झाली आहे. ज्या माळकर्‍याची किडणी राजाला अनुकूल असेल ती बसविण्यात येणार आहे. आपली किडणी काढली जाऊ शकते. या भितीने खोट्या माळकर्‍यांनी आपल्या माळा काढल्या! जे खरे माळकरी होते ते टिकले. यालाच खरा परमार्थ म्हणतात.

आज एकादशीचे कीर्तन – 
आज गुरुवारी एकादशी असल्याने 1 ते 2 यावेळेत प्रवचन होणार आहे. आणि लगेचच 2 ते 4 यावेळेत कीर्तन होणार आहे. एकादशी निमित्त भाविकासाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. 250 क्विंटल साबुदाना, 400 तुपाचे डबे, 80 क्विंटल शेंगदाने, 20 क्विंटल हिरवी मिरची, 60 क्विंटल बटाटे यासाठी वापरण्यात येणार आहेत. सांगतेच्या महाप्रसदासाठी संजिवनीचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांच्यावतीने 25 पोते साखर देण्यात आली आहे. भाविकांना एकादशीच्या फराळाच्या वाटपासाठी 5000 वाढप्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सप्ताह समितीच्यावतीने भाविकांसाठी खास फिल्टरच्या पाण्याचे नियोजन केले आहे. सप्ताह स्थळाच्या चारही बाजूने दोन लाख लिटर पाणी दररोज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी चार हजार तोट्या नळांना बसविण्यात आल्या आहेत. या सप्ताहाच्या बंदोबस्तासाठी 350 पोलीस कार्यरत आहेत. मुंबई नागपूर हायवेवर वैजापूरजवळ जड वाहतूक अडविण्यात आली आहे. त्यांचा मार्ग बदलविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*