कोपर्डीत येऊ न दिल्याची खंत : आठवले

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – आरोपी किंवा पीडित व्यक्ती कोणत्या जातीची आहे, हे महत्त्वाचे नाही. आरोपीला शिक्षा होणे व पीडिताला न्याय मिळणे हे महत्त्वाचे आहे, असे माझे तत्त्व असून कोपर्डी प्रकरणात मला पीडित मुलीच्या आईवडिलांना भेटू दिले नाही. हा केवळ राजकीय डावपेच होता, अशी खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविली.

आठवले म्हणाले, दिल्लीत निर्भया प्रकरण घडले. तेव्हा आम्ही त्या मुलीची किंवा आरोपींची जात पाहिली नाही. सर्व लोक न्यायाच्या उद्देशाने एक झाले होते. खैरलांजी हत्याकांड झाले तेव्हा देखील दलित समाजाने कोणत्याही समाजास वेठीस धरले नव्हते. केवळ आरोपींना शिक्षा व्हावी हाच अजेंडा घेऊन आम्ही आंदोलने केली. अन्य ठिकाणी दलित मुलींवर अत्याचार झाले. तरी देखील कोणत्याही समाजाला वेठीस धरले नाही.

नगरमध्ये खर्डा येथे प्रेम प्रकरणातून नितीन आगेची हत्या करण्यात आली होती. तेव्हा सर्व जातीचे व राजकीय पक्षाचे लोक कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी दलित संघटनांनी कोणाला विरोध केला नाही. मात्र कर्जत तालुक्याक्यातील कोपर्डी येथे घटना घडल्यानंतर मी मुंबईला आलो होतो. नगरकडे निघालो असता मला तेथे न येण्याची विनंती करण्यात आली. केवळ दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी मी तेथे येणे टाळले.

मात्र जातीच्या मुद्यावर त्या समाजातील लोकांना पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटू न देणे ही खेदाची बाब आहे असे आठवले म्हणाले. जिल्ह्यात 2012 साली दलित अत्याचाराच्या घटना 94 होत्या, 2013 मध्ये 117, 2014 मध्ये 115, 2016 मध्ये 116, तर चालु वर्षात 37 केसेस दाखल आहेत. या घटनांचे प्रमाण वाढत असून त्यावर उपायोजना करण्यासाठी ठोस भूमिका घेण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.

विजय वाकचौरे, अशोक गायकवाड पक्षातच
कोपर्डी प्रकरणानंतर बहुजन क्रांती मोर्चे निघाले. या दरम्यान राज्यसचिव विजय वाकचौरे व प्रवक्ते अशोक गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र ही दोन्ही नेते पक्षातच असून त्यांच्याकडे तीच पदे कायम आहेत. विशेष म्हणजे या दोघांना पक्षातून काढल्याची माहिती मला नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गायकवाड व वाकचौरे यांची हकालपट्टी करणारे कोण असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

*