भंडारदरा, मुळा पाणलोटात जोरदार पाऊस

0

पिंपळगाव खांड धरणही ओव्हरफ्लो, पाणी मुळा धरणाच्या दिशेने

भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर) -उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर आणि रतनवाडीत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आज शुक्रवारी पाण्याची आवक वाढणार आहे. गत 24 तासांत भंडारदरा धरणात 93 दलघफू पाणी नव्याने जमा झाले.

त्यात 53 दलघफू पाण्याचा वापर झाला तर 40 दलघफू पाणी धरणात जमा झाले. सायंकाळी पाणीसाठा 2427 दलघफू झाला होता.दरम्यान, मुळा पाणलोटातही पावसाचा जोर काहीसा वाढला असून आंबित पाठोपाठ 500 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले असून आता पाणी मुळा धरणाच्या दिशेने निघाले आहे.पावसाचा असाच जोर कायम राहिल्यास उद्या धरणात नवीन पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे.

गत दोन दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने डोंगर दर्‍यांवरील धबधबे पुन्हा सक्रिय झाले असून ओढे नाले भरभरून वाहत असून धरणात समावत आहेत. वाकी परिसरातही आर्द्रा नक्षत्राच्या सरी कोसळत असल्याने तलावातील पाणीसाठा 53 टक्क्यांच्या पुढे सरकला आहे.काल गुरूवारीही पावसाचा जोर टिकून होता. न्हानीफा!, पांजरा, नेकलेस व अन्य फॉल पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वातावरणात गारवा वाढल्याने धुण्या पेटण्यास सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी भात आवणीच्या कामास वेग आला आहे.

कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा धरणाच्या पाणलोटात बुधवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या. पण दुपारनंतर काहीशी उघडीप होती. पावसाळी वातावरण टिकून असलेतरी पावसाचा फारसा जोर नाही.
मुळा पाणलोटातील हरिश्‍चंद्र गड,आंबित, पाचनई, कूमशेत परिसरात पावसाचे सातत्य टिकून असल्याने मुळा नदीतील विसर्ग वाढत आहे. रात्री दीड वाजता पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले असून 500 क्युसेकपेक्षाही अधिक वेगाने पाणी मुळा धरणाकडे झेपावले आहे. पाऊस वाढल्याने आता शेतीकामांना वेग आला आहे.

वीजनिर्मिती सुरू – भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने काल सकाळी 11 वाजता वीजनिर्मिती प्रकल्प सुरू आहे. या धरणातून वॉलद्वारे 448 तर टनेलद्वारे 756 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

भंडारदरा पाऊस (मिमी) –  भंडारदरा   34 , घाटघर          102, पांजरे    70, रतनवाडी        164, वाकी    35

LEAVE A REPLY

*