Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपावसाळी गटार योजनेचे पितळ उघडे

पावसाळी गटार योजनेचे पितळ उघडे

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

नाशिक महापालिकेने ( NMC ) केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान योजनेअंतर्गत शहरात सुमारेे 400 कोटी रुपये खर्चून ‘पावसाळी गटार योजना’ (Rainwater Drainage Scheme ‘)राबवली खरी.

- Advertisement -

मात्र, त्यानंतर दरवर्षी त्या गटारी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ व त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे गांंभीर्याने न पाहिल्याने व सुरुवातीला योजना राबवताना ज्या चुका झाल्या, त्यावर पांंघरुण घातल्याने व सांगूनही त्या दुरुस्त न केल्याने गेल्या दहा वर्षांपासून या योजनेला सडकून टिकाच सहन करावी लागत आहे. दरवर्षी साचणारे पावसाचे पाणी पाहून चारशे कोटींचा हिशेब मागीतल्याशिवाय नागरिकांना राहवत नाही. दरवर्षी पावसाळ्यात या योजनेचे पितळ उघडे पडत आहे.

महापालिकेने 400 कोटी रुपयांच्या ‘पावसाळी गटार’ योजना राबवली. योजना राबविण्यापूर्वी त्यावर टीकाही झाली होती. नाशिकची भौगोलिक स्थिती पाहता पावसाचे पाणी वाहून नेण्याइतपत ही योजना उपयुक्त ठरेल काय, असे प्रश्न उपस्थित झाले होते. अधिकार्‍यांनी अनेक फायदे पटवून दिले. शहरात 305 किलोमीटर पाइपलाइन टाकण्याला मंजुरी मिळवली.

योजनेसाठी ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेल्या शहरातील वाहतुकीवर त्याचा ताण पडला. तो ताण दूर करण्यासाठी रस्ते दुरुस्तीवर 200 कोटी रुपये खर्च केले. पावसाळ्यात पाणी साचले नसते तर कदाचित चारशे कोटी रुपये दरवर्षी कोणी उकरुनही काढले नसते. पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. ज्या भागात पावसाळी गटार योजना राबविली गेली नाही तेथील अवस्था तर भयानक आहेच, परंतु जेथे योजना राबविली तेथील स्थितीही अवघड दिसत आहे. अनेक भागात पावसाचे पाणी साचून निर्माण झालेली तळी दिसत आहेत.

यंदा तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी महापालिकेने नियोजन केले. पावसाळी नालासफाईची कामे पूर्ण झाली. आरसीसी पाइप चेंबरची सफाईही पूर्ण झाली. त्याचबरोबर पावसाळी खुल्या गटार योजनेतील कामेही पूर्ण झाली. शहरात 92 हजार 771 मीटर लांबीच्या गटारींची सफाई पूर्ण करण्यात आली. पावसाळी गटार योजनेतील ढापे काढून पाइपलाइन स्वच्छ करण्यात आली.

नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड सर्वच भागांतील कामे पूर्ण करण्यात आली. आपत्कालीन व्यवस्थाही करण्यात आली. पाणी साचण्याच्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. असे आयुक्त रमेश पवार यांनी गेल्या मे महिन्यात पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला होता, त्यावेळी सांंगण्यात आले होते. तेव्हा त्यांनी विभागीय अधिकार्‍यांना सूचनाही केल्या. विभागनिहाय पथके तयार ठेवण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. एकच महिन्यात त्यांना गटारी तुंबल्याचा प्रत्यय आला व सफाई करताना तकलादु होती, याची प्रचिती आली असावी.

स्वच्छता देखभालीकडे दुर्लक्ष

पावसाळी गटार योजना चांगली आहे. मात्र, दरवर्षी एप्रिलमध्येच त्या गटारी साफ करुन तिची देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे. तरच पावसाचे पाणी वाहून जाऊ शकते. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसावे. त्या गटारीत माती, प्लास्टिक साचते. 50 मीटर व्यासाची पाइपलाइन असेल तर त्यात कचरा साचून ती अरुंद होते. त्यात पुन्हा पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर एकदम आले तर गटार तुंबते. त्यामुळे दरवर्षी स्वच्छता व देखभाल दुरुस्तीकडे तेवढेेच गांभीर्यानेे पाहण्याची गरज आहे. कधीकधी चेंबरवरील छिद्रेदेखील काढलेली नसतात. यामुळेच पहिल्याच पावसात पाणी साचते.

– गुरुमितसिंग बग्गा, माजी उपमहापौर, नाशिक

गटारींचे पाणी गोदावरीत नको

मूळ पावसाळी गटार योजना राबवतांंनाच ज्या चुका झाल्या, त्या दुरुस्त करण्याशिवाय तरणोपाय नाही. कारण सीबीएस, गोल्फ क्लबकडून येणार्‍या पावसाळी पाण्याची दिशा जोपर्यंंत बदलत नाही, तोपर्यंत जुन्या नाशिकमधील सखल भागातील नागरिकांंंचा त्रास कमी होणार नाही. वरवर मलमपट्टी करुन केवळ समजूत घातली जाते. मूळ प्रश्न सुटत नाही. त्यासठी पावसाळी गटारीचे डायव्हर्शन करणेच गरजेचे आहे.

– शाहू खैरे, नगरसेवक

- Advertisment -

ताज्या बातम्या