पावसाचा चकवा व शेतकर्‍यांची दमछाक

0

शेवगाव तालुक्यातील स्थिती; भविष्यकाळ काळोखमय

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – दिवसभर आकाशात ढगांची नुसतीच गर्दी….ऊन-सावल्यांचा चाललेला खेळ…कधी भुरभुर तर कधी वेगाने वाहणारा वारा….पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, मात्र दमदार पाऊस कधी पडणार ? हा प्रश्नच…..या काळजीने चिंताग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांसमोर आता काळोखमय भविष्यकाळ ‘आ’ वासून उभा राहिल्यागत झाले आहे. खरीप हंगाम हातातून गेल्यात जमा आहे. यामुळे मागील वर्षी झालेल्या पावसामुळे पूर्वपदावर येऊ लागलेले तालुक्याचे अर्थकारण साफ कोसळणार आहे.

यावर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे तसेच सर्वत्र घुमू लागलेल्या हवामानाच्या अंदाजामुळे शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या होत्या. या झालेल्या पावसावर काही शेतकर्‍यांनी कपाशीचे बियाणे टोकण्याचे धाडस संसाराचा रथ सुरळीत चालावा म्हणून केले. मात्र पावसाने शेतकर्‍यांच्या या आशेवर पुरता नांगर फिरवला आहे. उगवून निघालेले इवलेशे हजारो हेक्टर क्षेत्रातील रोपटे पाण्याअभावी पुन्हा सुकून जाऊन मातीत एकरुप झाले. तर काही ठिकाणी पेरलेले बियाणे उगवलेच नाही. तर काही शेतकर्‍यांनी काळजावर दगड ठेवत शेतातील रोपटे भुईसपाट केले. दुबार पेरणी करावी लागेल. यासाठी सरकारने मदत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या.

पाऊस पडेल व दुबार पेरणीचीही काही शेतकरी वाट पाहत होते. मागील 20 दिवसापूर्वी तालुक्याच्या काही भागात पावसाने फक्त एक दिवस जोराची हजेरी लावली व पुन्हा चकवा दिल्याने शेतकऱी आर्थिक संकटाच्या जीवघेण्या भोवर्‍यात अडकला आहे. या पावसानंतर काही शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड केली. तर काही शेतकर्‍यांनी पावसाचा मागील अंदाज घेत आणखी पाऊस झाल्यानंतर पेरणी करण्याचे ठरवले. मात्र अद्याप पाऊस न आल्याने मशागत केलेले मोठे जमीन क्षेत्र काळेभोर ओसाड पडलेले दिसत आहे.

तसेच या पावसावर आधारित झालेली पेरणीही धोक्यात आली आहे. अमरापूर, फलकेवाडी, भगूर, आव्हाणे या भागातील काळ्या सुपीक जमिनीत डोलणार्‍या हिरवेगार पिकाऐेवजी ओसाड शेती लक्ष वेधून घेत असून भीषण परिस्थितीची जाणीव करुन देत आहे. अधून मधून पडणार्‍या भुरभुर पावसामुळे बांधावरील व रस्त्याच्या बाजूचे गवत फक्त हिरवे दिसत आहे. जेथे पाण्याची उपलब्धता आहे तेथे काही प्रमाणात पिके दिसत आहेत.

तालुका कपाशीचे आगर म्हणून गणला जातो. मात्र पावसाअभावी यंदा गारगार पडला आहे. मागील काही वर्षापासून तालुक्याच्या अर्थकारणाला कपाशीने गती दिली. सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या जीवनात या पांढर्‍या सोन्याच्या पिकाने स्थैर्य आणण्यास मदत केली.

किमान श्रावणात तरी पाऊस पडेल व ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दा़टे चोहीकडे’ या पंक्ती खर्‍या ठरतील ही आशाही फोल ठरु लागली आहे. नद्या-नाले कोरडी दिसत असून हिरवीगार दिसणारी सृष्टी कोमेजून गेलेली दिसत आहे. पाण्याची खळखळणारे प्रवाह मुके झाले आहेत तर वाहणारे धबधबे मृतवत दिसत असून पाण्याच्या पांढर्‍या खुणा दिसत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या समस्या काही गावातून भेडसावू लागल्या आहेत. वातावरणातील उत्साह गळून पडल्यागत झाला आहे. येणार्‍या काही दिवसात पाऊस आला नाही तर परिस्थिती गंभीर बनेल. ऱब्बी हंगामाचेही काय होईल ते सांगणे अवघड आहे.

या परिस्थितीत काही शेतकर्‍यांसाठी एकच दिलासादायक बाब म्हणजे जायकवाडी जलाशय. नाशिक जिल्ह्ययांतील धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे 50 टक्क्यांची पाणी पातळी गाठली आहे.

शेवगाव शहर परिसरात व तालुक्यात कपाशीवर आधारित कोटी रुपये गुंतवुन जिनिंग मिल, ऑईल मिल व पेंड निर्मितीच्या उद्योगांनी भरारी घेतली आहे. हजारोंच्या हातांना काम मिळाले तर बाजारपेठेतील व्यवहार फुलले. कोटी रुपयांच्या उलाढाली झाल्या. तालुक्याचा आर्थिक आलेख उंचावु लागला. मात्र मागील एक वर्षाचा अपवाद वगळता सलग 4 वर्षापासुन पावसाच्या लहरीपणाने सर्वांची पुरती दैना करुन टाकली आहे. उद्योजक व शेतकर्‍यांवरील आर्थिक बोजात भर पडु लागली आहे. या बोजामुळे आर्थिकदृष्ट्या कोलमडुन पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

*