नाशकात पावसाची विश्रांती; धरणे तुडुंंब भरली; सहा दिवसांत 305 मिमी पाऊस

0

नाशिक । जून, जुलैमध्ये धो धो बरसणार्‍या पावसाने श्रावणात मात्र विश्रांती घेतली आहे.ऑगस्टच्या पहिल्या सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात 305.7 मिलीमीटर म्हणजेच 7 टक्के पाऊस झाला आहे. मात्र मागील दोन महिन्यांच्या पावसामुळे जिल्ह्यातील सात धरणे पूर्णपणे भरली असून इतर धरणांमध्येही पुरेसा पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील 24 प्रकल्पांमध्ये 74 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

जून आणि जुलैमध्ये जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे धरणे भरण्यासही मोठी मदत झाली. धरणांमध्ये पाणी साठवून ठेवणे शक्य नसल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढून नाशिककरांनी तीनवेळा पूरपरिस्थितीचा अनुभव घेतला. जिल्ह्यातील दहाहून अधिक तालुक्यांमध्ये जून आणि जुलै महिन्यांच्या सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे.

तसेच पावसाच्या एकूण सरासरीच्या 80 टक्के पाऊस जिल्ह्यात पडला आहे. परंतु ऑगस्टमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. पहिल्या सहा दिवसांत जिल्ह्यात 104.7 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी 7.23 टक्के पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

त्यातही मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा, येवला, सिन्नर या तालुक्यांमधून पाऊस पूर्णत: गायब झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गंगापूर धरण समूहात 89 टक्के पाणीसाठा असून समूहातील आळंदी धरण पूर्णपणे भरले आहे. तर गंगापूर धरणात 83 टक्के, काश्यपी धरणात 96 टक्के पाणीसाठा आहे. पालखेड धरण समूहात 83 टक्के, दारणात 100 टक्के तर गिरणा खोर्‍यात 51 टक्के पाणीसाठा आहे.

सात धरणे भरली : जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्याचप्रमाणे इतर धरणेही भरल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. यामुळे जायकवाडीला आतापर्यंत 40 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी निम्मे भरले आहे. त्यामुळे मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

*