त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या पंधरा वीस दिवसापासूनच गायब असलेल्या पावसाने ( Rain ) कालपासून त्र्यंबकेश्वर परिसरात ( Trimbakeshwar Area ) जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकर्‍यांना ( Farmers ) दिलासा मिळाला असून शेती कामांना जोमाने सुरवात झाली आहे.

दरम्यान खरीप हंगामासाठी ( Kharif Season )पेरणी केल्यानंतर पावसाने खो दिला होता. त्यामुळे भात पिक उपटून टाकायची वेळ शेतकर्‍यावर आली होती. तर अनेक ठिकाणी दुबार पेरणी देखील केल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु काल दुपारपासून पावसाची संततधार सुरूच असून यामुळे भात पिकासह इतर पिकांना दिलासा मिळणार आहे.

त्र्यंबक तालुक्यात भातशेतीचे प्रमाण अधिक असते. भात लावणीसह टोमटो, नागली वरई आदी पिकाची लागवड करण्यास सरुवात केली जाते. सध्या मजुरांअभावी ही सर्व कामे घरातील कुटुंबीयांचे सदस्य आपल्या परीने करीत होते. या पिकांसाठी पावसाची नितांत गरज असताना वरुणराजा रुसून बसला होता. पावसाच्या कृपावृष्टीसाठी शेतकरीवर्ग आकाशाकडे डोळे लावून बसला होता.

शेती व्यवसायाची कामे वेळेवर करूनही पिके हातची जाण्याची वेळ आल्याचे चित्र दिसत होते. अशी अवस्था असताना वरुणराजा समाधानकारक बरसल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *