Tuesday, April 23, 2024
Homeनगरपावसाच्या आगमनाने शेतकर्‍यांमध्ये उत्साह

पावसाच्या आगमनाने शेतकर्‍यांमध्ये उत्साह

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधान पसरले आहे. मान्सून वेळेवर सुरू होण्याची चाहूल लागली असून खरीप हंगामाविषयी आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

- Advertisement -

तालुक्यात मंगळवारी (दि. 1) रात्री आठच्या सुमारास वार्‍याबरोबरच पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी केले. रात्री उशिरापर्यंत बरसणार्‍या पावसांच्या जोरदार सरींमुळे शेतातील अनेक सखल भागात पाणी साचले. तर ओढे, नाले, शेतांमधून पाणी वाहू लागले. तालुक्यातील सर्वही सहा मंडलांत पावसाने हजेरी लावली असून सर्वाधिक 64 मिलीमीटर पाऊस शेवगाव मंडलात तर सर्वात कमी 20 मिलीमीटर पाऊस ढोरजळगाव मंडलात झाला.

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या कपाशीसोबतच तूर, मूग, सोयाबीन, बाजरी या पिकांच्या पेरणी व लागवडीसाठी मशागतीची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान बुधवारी तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस झाला.

नालेसफाई न केल्याने साचले पाणी

शेवगाव शहरात तर पावसाने अनेकांची पळापळ केली. खंडोबानगर मधील बाळासाहेब भारदे विद्यालया लगतच्या चौकात कमरे इतके साचलेले पाणी काही दुकानांत शिरले. रस्त्यावर पाणी पसरल्याने रस्ता बंद झाला. नगरपरिषदेने पावसाळ्यापुर्वी शहरातील नालेसफाई व्यवस्थित न केल्याने पहिल्याच पावसात अनेक नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरून नुकसान झाले. तर शहरातून नगर, नेवासा आणि पैठणकडे जाणार्‍या रस्त्याला नाल्याचे रूप आले होते. रस्ता पार करताना कसरत करण्याची वेळ आली.

मंगळवारी झालेल्या मंडलनिहाय पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये शेवगाव- 64, भातकुडगाव- 47, बोधेगाव- 29, चापडगाव- 33, एरंडगाव- 32, ढोरजळगाव- 20

- Advertisment -

ताज्या बातम्या