Saturday, April 27, 2024
Homeनगरराहुरीच्या उसाच्या फडावर चालणार 12 साखर कारखान्यांचा कोयता

राहुरीच्या उसाच्या फडावर चालणार 12 साखर कारखान्यांचा कोयता

बारागाव नांदूर |वार्ताहर| Baragav Nandur

केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या भौगोलिक नकाशावर राहुरी तालुक्याची बागायती तालुका अशी नोंद आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्याची भूमी ही उसाचे माहेरघर समजली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा डोळा राहुरीच्या उसाच्या फडाकडे असतो. तालुक्यात पाऊसपाण्याची आबादानी असल्याने यंदा 11 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे या फडावर जिल्ह्यातील तब्बल 12 हून अधिक साखर कारखान्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. यावर्षी दरवर्षीप्रमाणेच राहुरीतील उसाच्या फडावर या साखर कारखान्यांचे कोयते चालणार आहेत.

दरम्यान, गळीत हंगामाची चाहूल लागली असतानाच जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी ऊस गाळपाची जय्यत तयारी सुरू केली आहे. परंतु अजूनही ऊस दराची कोंडी कोणी फोडलेली नसल्याने शेतकर्‍यांचे लक्ष साखर कारखानदारांच्या घोषणेकडे लागले आहे. कोणता कारखाना सर्वाधिक दर देणार? याकडे ऊस उत्पादक लक्ष ठेवून आहेत.

राहुरी तालुक्यातील आर्थिक आरिष्टात सापडलेल्या डॉ. तनपुरे कारखान्याला आपले अस्तित्व वाचविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत उच्चांकी गाळप करावे लागणार आहे. कारखान्याची अद्यावत यंत्रणा निर्मिती होत असतानाच कोयत्यांची संख्या वाढविण्याचे आवाहन तनपुरे कारखान्यापुढे असणार आहे.

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढूस यासह संचालक मंडळ ऊस गाळपासाठी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पोहोचले आहे. तनपुरे कारखान्याच्या वतीने 7 लाख मे.टन ऊस गाळपासाठी तयारी होत असल्याची माहिती मिळाली आहे.

वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याला राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलीच घोडदौड सुरू आहे. प्रसाद शुगर कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून आसवणी प्रकल्पाचा लाभ कारखान्याला लाभणार आहे. 30 केएलपीडी क्षमतेचा आसवणी प्रकल्प यंदाच्या गळीत हंगामातच प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांनी दिली आहे.

यासाठी प्रसाद शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख व सुरेशराव बाफना, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य नियोजन केले आहे. एकीकडे तनपुरे कारखान्याचे 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य तर दुसरीकडे प्रसाद शुगरने 7 लाख मे.टन ऊस गाळपासाठी केलेले नियोजन पाहता दोन्ही कारखान्यांना उसासाठी अन्य कारखान्यांबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या