राहुरी तालुक्यात दुसर्‍या दिवशीही पावसाची हजेरी

0

राहुरी ़(तालुका प्रतिनिधी) – काल काही काळ उघडीप देऊन सकाळी 10 वाजल्यापासून वरुणराजाने राहुरी शहरासह तालुक्यात दमदार हजेरी लावली असून या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहे. करपरा नदीला पूर आल्याने शिलेगाव येथील करपरावाडीचा संपर्क तुटला असून नदीच्या कडेला असलेले दोन घरे पडून संसारोपयोगी सामान वाहून गेले.

शिलेगाव येथील करपरावाडी ही नदी व ओढ्याच्या तयार झालेल्या बेटावर वसली आहे. शनिवारपासून पावसाची संतत धार सुरू आहे. यामुळे करपरानदी व ओढ्याला पूर आला आहे. या पूरामुळे करपरावाडीला चारहीबाजूने पाण्याने वेढले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात वाढ झाल्याने नदीच्या काठावर राहणार्‍या कुशीनाथ माळी व दशरथ पवार यांच्या घरात पाणी शिरून दोन्ही घरे पडून वाहते झाले. त्यात संसारोपयोगी सामान वाहून गेले.

पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून पाऊस जर दोन-तीन दिवस उघडला नाही तर मोठ्या कष्टाने उभे केलेले खरिपाचे पीक हातातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कपाशी , सोयाबीन, कडवळ, मका, घास व कांद्याच्या भुसार्‍यात व अनेक घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने शेतकर्‍यांचे पाणी काढून देण्यासाठी कसरत सुरू होती.

राहुरी शहरात सकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत होत्या मात्र दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पोळ्याच्या सणासाठी खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकरी वर्गाची मोठी धांदल उडाली होती. पाऊस धो- धो कोसळत असल्याने राहुरीच्या बाजारपेठेत अघोषीत संचारबंदी असल्यासारखे जाणवत होते. तरीही वर्षभर आपल्यासोबत काबाडकष्ट करणार्‍या बैलांना सजावटीसाठी लागणार्‍या सामानाची खरेदी करण्यासाठी भर पावसात बळीराजाची धडपड सुरू होती.

LEAVE A REPLY

*