निधी काँग्रेसचा, जाहिरातबाजी युतीची! : ना. विखे यांची टिका

0

शेततळयाप्रकरणी श्रेय लाटल्याचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) – जाहिरातबाजीवरून अडचणीत आलेल्या सरकारवर ‘जनतेची दिशाभूल करणारे सरकार’ अशी टिका विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ‘मी लाभार्थी’ या सरकारी जाहिरातीत दाखविण्यात आलेल्या शेततळ्यासाठी काँग्रेसच्या आघाडी सरकारने जुलै 2014 मध्ये निधी दिला.

याशिवाय संबंधित शेतकर्‍याने कर्ज काढून शेततळ्याचा उर्वरित खर्च भागवला होता. मात्र आपल्या सरकारने हे शेततळे केल्याचे भासवून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील भिरावी येथील शेतकरी शांताराम कटके यांच्या शेतातील शेततळ्याचे छायाचित्र वापरून सरकारने आपल्या तीन वर्षपूर्तीची जाहिरात केली. मात्र या शेतकर्‍याला आघाडी सरकारच्या काळात निधी मिळाला आणि त्याने उर्वरित कर्ज घेवून शेततळे पूर्ण केल्याचे समोर आले आहे.

या मुद्यावरून बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने सुरू केलेल्या जाहिराती फसव्या, वस्तुस्थितीशी विसंगत आणि अतिशयोक्तीपूर्ण आहेत. शेततळे योजनेसंदर्भात प्रकाशित झालेल्या जाहिराती हेच सिद्ध करतात. कटके यांना काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात जुलै 2014 मध्ये शेततळ्यासाठी 1 लाख 79 हजार रूपये मंजूर झाले होते. शिवाय या शेततळ्यासाठी लागलेली एकूण रक्कम मंजूर निधीपेक्षा किती तरी अधिक होती. त्यामुळे शांताराम कटके यांनी कर्जही घेतले होते. कटके यांनी अत्यंत परिश्रमाने उभारलेल्या शेततळ्याची खोटी जाहिरात करून त्याचे संपूर्ण श्रेय लाटण्याचा अश्लाघ्य प्रकार राज्य सरकारने केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

…….
निव्वळ गाजावाजाभाजप-शिवसेनेचे सरकार आपल्या कामांची नव्हे तर काँग्रेस आघाडी सरकारच्याच काळातील योजनांची आणि निर्णयांची जाहिरात करते आहे. या सरकारकडे लोकांना सांगण्यासाठी स्वतःची अशी कोणतीही विशेष कामगिरी नाही. नावे बदलून किंवा किरकोळ बदल करून काँग्रेस आघाडी सरकारमधील ज्या योजनांची कशीबशी अंमलबजावणी सुरू आहे, त्याच योजनांचा आज भाजप-शिवसेना गाजावाजा करीत असल्याचा ठपकाही विखे पाटील यांनी ठेवला आहे.
……..
जनतेशी प्रतारणासरकार केवळ स्वकौतुकासाठी लोकांना असत्य, अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती देत आहे. ही जनतेशी प्रतारणा आहे. सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. जनतेचा विश्वासघात केल्याबद्दल या सरकारचा राजीनामा मागणे निरर्थक आहे. थोडी जरी चाड शिल्लक असेल तर खोट्या जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल सरकारने जनतेची माफी मागवी, अशी मागणी ना.विखे पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*