रॅम फिनिशर्सचे नाशिक शहरात जंगी स्वागत; हत्तीवरून काढली मिरवणूक

0
नाशिक | रेस अॅक्रॉस अमेरिका म्हणजेच रॅम या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या सायकलिंग स्पर्धा पूर्ण केल्यानंतर टीम सह्याद्री आणि टीम श्रीनिवास यांचे आज (दि. २९) सकाळी ७ वाजता नाशिक शहरात जंगी स्वागत करण्यात आले.

सकाळी मुंबई विमानतळावरून नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर लगेचच लेफ्टनंट कर्नल श्रीनिवास गोकुलनाथ आणि टीम सह्याद्रीची चौकडीपैकी डॉ. राजेंद्र नेहेते डॉ. रमाकांत पाटील आणि पंकज मारलेशा यांचे फेटा बांधून औक्षण करत भारतीय परंपरेनुसार स्वागत करण्यात आले.
त्यानंतर चौघांची हत्तीवरून ढोल ताशाच्या गजरात हॉटेल गारवा ते पाथर्डी फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. टीम श्रीनिवास आणि टीम सह्याद्री यांच्या यशात सहभागी असणारी ट‌ीमही या मिरवणूकीत सहभागी झाली होती. यावेळी २०० हून अधिक सायकलीस्ट उपस्थित होते.
अमेरिकेच्या पश्चिम टोकापासून पूर्वेकडील समुद्र किनाऱ्यापर्यंतचा ३००० मैलाचा खडतर प्रवास सायकलवर करत ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी स्पर्धकांचा कस लागत असतो. त्यात नाशिकच्या कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ यांनी वैयक्तिक (सोलो) गटात काल ११ दिवस १८ तास ४५ मिनिटात ही रेस पूर्ण केली आहे. ते आपल्या गटात सातव्या क्रमांकावर राहिले. तर टीम सह्याद्रीने रिले प्रकारात स्पर्धेत उतरताना ४ जणांच्या संघाने केवळ ८ दिवस १० तास आणि १६ मिनिटात ही रेस पूर्ण केली आहे.
स्वागत प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीनिवास म्हणाले की, स्वतःवर विश्वास ठेवल्यामुळेच मला रॅम पूर्ण करण्याचे स्वप्न बघता आले आहे. मागीलवर्षी २०१६ मध्ये स्पर्धा पूर्ण करण्यास अपयश आल्यानंतर क्रु टीम मध्ये असणाऱ्या माझ्या पत्नीने आधार दिल्यानेच मला पुन्हा एकदा उभे राहता आल्याची भावना डॉ. श्रीनिवास यांनी व्यक्त केली.
टीम सह्याद्रीचे डॉ. राजेंद्र नेहेते म्हणाले की, २०१५ मध्ये महाजन बंधूंचा क्रु मेंबर सहकारी म्हणून गेलो होतो तेव्हा महाजन बंधूंनी रेस पूर्ण केल्यानंतर डोळ्यात पाणी आले होते. मात्र आता आम्ही रेस पूर्ण केल्यानंतर महाजन बंधूंच्या डोळ्यात पाणी बघून आम्हाला आनंद झाला. हे स्वप्न महाजन बंधूंशिवाय पूर्ण होण शक्यच नव्हते अशी भावना व्यक्त केली.
यापुढे नाशिक सायकलीस्टचा किमान एक सायकलपटूने रॅम स्पर्धा जिंकावी अशी इच्छाही नेहेते यांनी बोलून दाखवली. त्यासाठी लागेल ती मदत करू असेही ते म्हणाले.
नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी आभार मानताना म्हणाले की, रॅम स्पर्धेसाठी दरवर्षी नाशिक सायकलीस्टचा किमान एक संघ पाठविण्याचा कार्यक्रम तयार करण्यात येणार असून नाशिक हे भारताचे सायकलिंग कॅपिटल होईलच, मात्र आता ते रॅम कॅपिटल झाली आहे हे नक्कीच. त्याग, कठोर मेहनत आणि वैयक्तिक शिस्त यामुळेच ही खडतर स्पर्धा पूर्ण करण्यात स्पर्धकांना यश मिळाले आहे.

 

LEAVE A REPLY

*