पुणेगाव पोहचकालव्याची चाचणी दृष्टिपथात

0

चांदवड। दि. 4 प्रतिनिधी
आमदार डॉ. राहुल आहेर यांनी नुकतेच जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या दालनात झालेल्या बैठकीत तालुक्यातील जनतेची पुणेगाव कालव्याबाबतची 44 वर्षांची आस, सध्याचे पूरपाणी, पूरपाण्याने टंचाईवर होऊ शकणारी मात व चाचणीतील अडथळे आदी बाबी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या.

याबाबत पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर जि. प. सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे यांनी अधिकार्‍यांसमवेत काजीसांगवी, दहिवद परिसरात कालव्याची पाहणी केली असून चाचणीच्या पूर्वतयारीचे कामे करण्याचे निर्देश संबंधितांना पालकमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

तालुक्याच्या माथी असलेला दुष्काळाचा शाप पुसण्यासाठी 1972-73 दरम्यान स्व. आमदार डॉ. ना. का. गायकवाड यांच्या दूर दृष्टितून पुणेगाव धरणासह पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा प्रस्तावित झाला. तेव्हापासून चांदवड तालुक्यातील विशेषत: दक्षिणपूर्व भागातील जनता या कालव्याकडे नजर लाऊन आहे.

कथित राजकारण्यांनी केवळ याचा राजकारणासाठी कळीचा मुद्दा म्हणून वापर केला. मधल्या काळात दुर्लक्षित झालेल्या कालव्याची कामे माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी बर्‍यापैकी मार्गी लावली.

परंतु त्यांच्या 10 वर्षाच्या काळात चाचणीपर्यंत मजल जाऊ शकली नाही. चांदवडच्या खडकजांब शिवारापर्यंत पूर्वी पाण्याची चाचणी घेऊन गतवर्षी परसूलपर्यंत प्रत्यक्ष चाचणी झाली.

दरम्यान आमदार डॉ. राहुल आहेर, जि. प. सदस्य डॉ. कुंभार्डे यांच्या प्रयत्नाने गतवर्षी दरसवाडी ते सोनीसांगवीपर्यंत कसे-बसे पाणी पोहचले. परंतु कालव्यातील अडथळ्यामुळे प्रभावी चाचणी होऊ शकली नाही.

यावर्षी सध्या परिस्थितीत तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात व दरसवाडी, केद्राई धरण परीसरात चांगला पाऊस झाल्याने केद्राई धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे तर दरसवाडी 85-90 टक्के भरले आहे. आगामी काळात एखाद्या चांगल्या पावसाच्या हजेरीने हि धरणे ओव्हरफ्लो होणार आहे. तर पूर्वभागात अद्याप दमदार पाऊस नसल्याने नदी, नाले, बंधारे कोरडे ठाक असल्याने दुष्काळाची टांगती तलवार आहे.

सदर धरणातील पुरपाणी कालव्याद्वारे दहिवद, काजीसांगवी, सोनीसांगवी पुढील भागात पोहचल्यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याने डॉ. कुंभार्डे यांनी आमदार आहेरांकडे या वास्तवासह कालव्यावरील प्रलंबित कामे, चाचणीतील अडथळे, अन् लाभ आदी बाबी आमदार डॉ. आहेर यांनी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या समवेत बैठकीत निदर्शनास आणून दिल्याने मंत्री महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेत कालव्याच्या साफसफाई तात्काळ निर्देश दिले.

तसेच प्रलंबित कामाबाबतही भूमिका घेतल्याने बहुप्रतिक्षेतील कालवा चाचणी प्रभावीपणे होणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर जि. प. सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे व सभापती डॉ. नितीन गांगुर्डे यांनी कार्यकारी अभियंता रमेश गावित, उपअभियंता व्हि. एम. बच्छाव, शाखा अभियंता आर. एम. शिरवाडकर यांच्या समवेत नुकतीच दहिवद, काजीसांगवी परीसरात कालव्याची पाहणी केली असून लवकरच कालव्याच्या सफाईला सुरुवात होणार आहे.

पाहणी करतांना नरेंद्र ठाकरे, प्रकाश ठाकरे, किरण ठाकरे, संजय बागूल, पोलीस पाटील दीपक ठाकरे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*