सुशिक्षित पैसे घेऊन मतदान करतात ही चिंतेची बाब : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – आजचे राजकारण हा चिंतेचा विषय बनला आहे. शहरात माफी पैशाच्या जोरावर निवडून येतात आणि नंतर केलेला पैसा वसूल करतात. याची लागण आता ग्रामीण भागातही होवू लागली आहे. अशा प्रकारे लोकशाही जिवंत राहणार नाही. सुशिक्षित, व्यावसायिक मतदार मतदानासाठी पैसे घेतात ही चिंतेची बाब आहे. यापुढील काळात युवा पिढीने निवडणुकांमधील पैसे रोखण्याची आवश्यकता आहे. अन्यथा राजकीय पक्ष विकास कामे करणार नाही, अशी भिती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

नगरच्या सहकार सभागृहात आयोजित माजी खा. दादा पाटील शेळके यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. बाळासाहेब थोरात होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. सुधीर तांबे, आ. राहुल जगताप, आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, अनिल राठोड, बबनराव पाचपुते, माजी आमदार जयंतराव ससाणे, भानुदास मुरकुटे, नंदकुमार झावरे, शिवाजीराव नागवडे, नरेंद्र घुले, दादा कळमकर, चंद्रशेखर घुले, चंद्रशेखर कदम, पांडूरंग अंभग, साहेबराव दरेकर, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरूण कडू, रामनाथ वाघ, विठ्ठलराव लंघे, बन्सीभाऊ म्हस्के, प्रशांत गडाख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ, माजी अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर, सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, सबाजी गायकवाड, वसंतराव कापरे, शिवाजी गाडे, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पक्षीय मान्यवर या वेळी उपस्थित होते.

आ. चव्हाण म्हणाले 1991 ला पहिल्यांदा पाहिलेल्या शेळके यांच्या पेहराव आजही तसाच कायम आहे. यात किंचितही बदल झालेला नाही. प्रदीर्घ राजकीय प्रवासानंतरही शेळके पूर्वी प्रमाणे साधेच आहेत. मात्र, चार वेळा आमदार आणि दोनदा खासदार झालेल्या माणसाला मंत्रीपद का मिळाले नाही याचे आर्श्‍चय वाटते. माणूस लोकप्रिय असल्याशिवाय अपक्ष म्हणून निवडून येत नाही.सर्वसामान्य शेळके यांच्या पाठीश उभे राहिल्याने त्यांना अपक्ष निवडून येता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आ. वळसे यांनी शेळके यांनी गेली 55 वर्षे सलग विविध राजकीय पदाच्या माध्यामातून जनतेच्या मनात स्थान टिकवून ठेवले. नगर जिल्हा राजकारण आणि सहकारच्याबाबतीत देशात अग्रस्थानावर आहे. जनतेशी बांधीलकी असणारे नेते या जिल्ह्यात आहेत. एकत्रिपणे विकासाचे राजकारण नगर जिल्ह्यातील नेत्यांनी केलेले आहे. शेळके हे राजकारणातील आदर्श उदाहरण आहे. मात्र, आजची तरूण पिढी सत्याची शहानिशा न करता सोशल मीडियाच्या माध्यामातून आयुष्यभर काम केलेल्या नेत्यांना राजकारणातून बाद करण्याची किमय घडवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आ. थोरात यांनी सचोटीने राजकारण करणार्‍या व्यक्तीचा समाजाने पुढाकार घेवून गौरव करणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही पुढाकार घेवून शेळके यांच्या अभिष्टचिंतनाचे नियोजन केले. पूर्वी जिल्ह्यातील आमदार विकास कामाचा विषय घेवून एकत्र मंत्र्यांकडे जात. मुंबईला गेल्यावर दररोज एकत्र जेवत. आता पाच वर्षात जिल्ह्यातील आमदार एकदाही एकत्र जेवल्याचे आठवत नाही. सामान्य माणसात राहून जनतेची कामे कशी करावीत हे शेळके यांच्याकडू शिकावे. पिक विम्याचा हिशोब चांगल्या नेत्याला कळणार नाही, ते शेळके यांनी ओळखले होते. याचा फायदा त्यांनी नगर तालुका आणि जिल्ह्याला मिळवून दिला.

सत्काराला उत्तर देतांना शेळके यांनी आजच्या तरूणांनी गाव घटक मानून राजकारण करावे. आताच्या काळात निष्ठपेक्षा पैशाला महत्व आले आहे. आज बंगल्यात राहणारा मतदानासाठी पैसे मागत आहे. निवडणुकीला उभे राहणार्‍यांनी जमीन विकून निवडणुका लढवाव्यात का? असा सवाल उपस्थित करत यापुढे निरपेक्ष भावनेने चिरीमिरी न घेता मतदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आ. कर्डिले, जिल्हा परिषद अध्यक्षा विखे आणि माजी आ. राठोड यांची भाषणे झाली. प्रस्ताविक ज्ञानदेव दळवी यांनी तर स्वागत जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके यांनी केले.

थोरातांचे नाव घेतांना हुकलो तर जिल्ह्यात काय घडेल…
आ. कर्डिले यांनी आपल्या मनोगतात आ. थोरातांचे नाव घेतांना हुकलो तर जिल्ह्यात काय घडेल, हे सांगता येत नाही असे म्हणातच हश्या झाला. सामान्य कुटूंबातील शेळके यांनी राजकीय पार्श्‍वभूमी नसतांना जनतेच्या जीवनावर आपली वाटचाल केली. त्यांची राजकीय कामगिरी अभिमानास्पद आहे. जिल्ह्याला त्यांची शंभरावी साजरी करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. हाच धागा पकडून त्यानंतर राठोड यांनी शेळके राजकारणातील ऋृषीतुल्य व्यक्तीमत्व आहे. पक्ष भले वेगवेगळे असोत माझ्या नगर शहरातील 25 वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात शेळके यांचा सिंहाचा वाटा आहे. नगर शहराच्या राजकारणात त्यांचे योगदान आहे. यामुळे पुढील 25 वर्षे नगर तालुक्याच्या राजकारणात सक्रीय राहवे, असे म्हणताच पुन्हा हस्याची लकेर उमटली. शेळके यांनी अनेक कार्यकर्ते, नेते घडवले. ते त्यांनी सोडून गेले असले तरी सामान्य कार्यकर्ता शेळके यांच्या सोबत असल्याची कोपरखळी राठोड मारताच पुन्हा हश्या झाला. वळसे यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच पुढील 25 वर्षे शेळके यांचे राजकारण सुरू राहिल्यास आ. कर्डिले यांच्यासाठी काळजीचा विषय असल्याचे म्हणताच सभागृह खदखदले.

 

LEAVE A REPLY

*