चिमुकल्यांचे साईदर्शनाचे निमंत्रण राष्ट्रपतींनी स्विकारले

0

राष्ट्रपतींना राखी बांधून विद्यार्थिनींचा राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन सण साजरा

शिर्डी (प्रतिनिधी)- शिर्डी येथील साईनिर्माण इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी देशाचे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. देशातील 40 शाळांमधील 100 विद्यार्थिनींना रक्षाबंधनासाठी राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनात येण्याचे निमंत्रीत केले होते. यात राज्यातील साईनिर्माण इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींचा समावेश होता. या शाळेतील विद्यार्थिनींनी राष्ट्रपतींनी राखी बांधल्यावर शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रणही स्वीकारले आहे.

संस्थेचे अध्यक्ष विजयराव कोते यांनी या विद्यार्थ्यांना विमानामधून दिल्लीला पाठविण्याची व्यवस्था केली. या विद्यार्थ्यांच्या समवेत शाळेचे मुख्याध्यापक विकास चौधरी व शिक्षिका स्वाती सोमवंशी होत्या. सोमवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान या विद्यार्थ्यांना थेट राष्ट्रपती भवनात प्रवेश मिळाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद व त्यांच्या कुटुंबीयांनी या विद्यार्थिनींचे स्वागत करून राख्या बांधून घेतल्याने मुलांचा आनंद द्विगुणीत झाला.

रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी या विद्यार्थ्यांना भेटवस्तूही दिल्या व राष्ट्रपती भवनात मुलांच्या जेवणाची व्यवस्थाही केली.जेवण झाल्यावर देशाच्या विविध भागातून निमंत्रीत केलेल्या या शालेय मुला-मुलींना राष्ट्रपती भवन दाखवण्यात आले. यावेळी शिर्डीतील जगदीशा ताराचंद कोते, तनुजा किशोर चौधरी, वैष्णवी बाबासाहेब कोळसे, अल्सीफा सलिम तांबोळी या विद्यार्थिनींसोबत मुख्याध्यापक विकास चौधरी व शिक्षिका स्वाती सोमवंशी यांनी राष्ट्रपतींना साईंची प्रतिमा व प्रसाद भेट म्हणून दिला. साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षात आपण साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येण्याचे आमंत्रणही दिले. त्यांच्या या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण साईंच्या समाधी शताब्दी सोहळ्यासाठी नक्की येवू असे आश्‍वासन राष्ट्रपतींनी या चिमुकल्यांना दिले.

साईनिर्माण स्कूलच्या चार विद्यार्थिनींना रक्षाबंधनासाठी थेट राष्ट्रपती भवनातून निमंत्रण येते हा शाळेचा मोठा सन्मान आहे. रक्षाबंधनाचे निमंत्रण मिळालेल्या विद्यार्थिनींच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून आपण या विद्यार्थ्यांना दिल्लीला जाण्यासाठी विमान प्रवासाची व्यवस्था केली. विद्यार्थिनींना राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना राखी बांधण्याचा योग आला. यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय, मुंबई सेन्सॉर बोर्डाचे सल्लागार डॉ. विवेककुमार शुक्ला यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
: विजयराव कोते
संस्थापक अध्यक्ष, साईनिर्माण इंग्लिश मीडियम स्कूल

LEAVE A REPLY

*