तयारी अकरावी प्रवेशाची; 35 हजार अर्जांच्या छपाईचे काम जवळपास पूर्णत्वास; बुधवारी होणार बैठक

0
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून जिल्ह्यातील प्रवेशासाठी 33 हजार अर्ज छपाईचे काम पुणे येथे सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हे काम पूर्ण होईल. पुढील प्रक्रियेसाठी बुधवारी बैठक होणार असून त्यानंतर प्रवेशाचे वेळापत्रक निश्चित होईल.

यंदा प्रथमच अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 22 हजार 560 जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

या नोंदणी प्रक्रियेदरम्यान या महाविद्यालयांतील संबंधितांशी वारंवार बैठक घेऊन त्यांना प्रवेशाबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्जाआधी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यानंतर ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. प्रवेश निश्चित झाल्यानंतर पुन्हा त्यांना आवडीनुसार महाविद्यालयाचा क्रम ठरवता येणार आहे.

अर्ज छपाईचे काम पुणे येथे सुरू असून ऑनलाईन प्रवेशाशी निगडीत सर्व बाबींचे काम दिल्लीतील कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी बुधवारी अधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली असून त्यानंतर योग्य ते वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
दरम्यान, निकालासाठी एक महिन्याहून कमी कालावधी शिल्लक असून कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया समजावून घेतली जात आहे. अद्याप माहिती पुस्तिका उपलब्ध न होऊ शकल्याने विद्यार्थी व पालक त्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, सर्व प्रवेश सुरळीत होतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*