प्रवरा नदीवरील बंधार्‍यांना नव्या फळ्या बसविणार

0

3 कोटी 57 लाखांच्या खर्च प्रस्तावास मान्यता

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील 19 कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यांचे नादुरूस्त झालेल्या लोखंडी फळ्या (बर्गे) काढून नवीन झडपा बसविण्यासाठी प्रस्तावित कामांच्या तीन कोटी सत्तावन्न लाख, सत्तर हजार नऊशे छप्पन्न एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास अटींवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक काल जलसंपदा विभागाने जारी केले.
प्रवरा नदीवरील 19 बंधार्‍यांमधील लोखंडी फळ्या गेल्या 25-30 वर्षांपासून वापरात आहेत. या बंधार्‍यांमध्ये पूर्ण पातळीपर्यंत पाणीसाठा होण्यासाठी एकूण 6389 इतक्या फळ्या आवश्यक आहेत. सध्या केवळ 2216 फळ्या चांगल्या स्थितीत असून 4173 फळ्या अंत्यत खराब झाल्या आहेत. परिणामी पाणीसाठा पूर्ण क्षमतेने करण्यास अनेक अडचणी येतात. या बंधार्‍यांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठल्यास 1900 हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनात वाढ होणार आहे. त्यासाठी दुसरूस्ती आणि नवीन फळ्यांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने आता खराब झालेल्या फळ्या काढून तेथे नवीन फळ्या बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे काम यांत्रिकी संघटनेमार्फत करण्याचे सूचविण्यात आले आहे. प्रकल्पा वरील पाणी वापर संस्थेकडे संपूर्ण लाभक्षेत्र हस्तांतरणाचे नियोजन काम सुरू करण्यापूर्वी करावे. कामे पूर्ण झाल्यानंतर लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या बंधार्‍यांचा समावेश – आश्‍वी, भेर्डापूर, चणेगाव, गळनिंब, मांडवे पारनेर, कमालपूर, केसापूर, खानापूर, मध्यमेश्‍वर, मालुंजा,मांडवे, नांदूर खंदरमाळ, पाचेगाव, पढेगाव, पुनतगाव, रामपूर, वळगदगाव, वांगी देहरे या बंधार्‍यांमधील 4173 फळ्या खराब झाल्या असून त्या बदलण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*