हरसूलला ‘त्या’ आत्महत्याच; शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात निष्कर्ष

0

नाशिक । त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील ठाणपाडा गावात आईसह दहा व बारावर्षीय मुलगा आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली.

ही आत्महत्या नसून जमिनीच्या लोभातून केलेला घातपात असल्याचा आरोप महिलेच्या वडिलांनी केला होता. परंतु शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार हा खून नसून आत्महत्याच असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

हौसाबाई गिरीधर लोखंडे (वय 36), नीरज गिरीधर लोखंडे (वय 12) आणि माधुरी गिरीधर लोखंडे (वय 10) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. रविवारी (दि.25) दुपारी 12 वा राहत्या घरात हौसाबाईसह तिची दोन्ही मुले गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणपाडा गावात राहणारे लोखंडे कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह करत होते. 4 महिन्यांपूर्वीच या घरातील करता पुरुष व हौसाबाईचा पती गिरीधर लोखंडे यांनी याच घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. यामुळे लोखंडे कुटुंबासमोर आर्थिक व इतर काही समस्या उद्भवल्या असाव्यात. त्यातून या तिघांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

हौसाबाई लोखंडे यांचे वडील जयराम बाळू धनवले (रा. चिखलपाडा, त्र्यंबकेश्वर) यांनी मात्र ही आत्महत्या नसून, जमीन बळकवण्यासाठी हौसाबाईच्या सासरच्या नातेवाईकांनी नियोजन करून केलेला खुनाचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप केला. होता. तिन्ही मृतदेहांचे पाय जमिनीला टेकलेले होते.

जमिनीच्या वादातून या तिघांची हत्या करून नंतर ती आत्महत्या असल्याचे भासवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र पोलीस तपास व प्रथमदर्शनी साक्षीदार यांनी सर्व मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट केल्यानंतर तसेच शवविच्छेदनाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार हा खुनाचा प्रकार नसून आत्महत्याच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतरही या घटनेचा बारकाईने तपास सुरू असून समोर येणार्‍या तथ्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

LEAVE A REPLY

*