चार लाख शिधापत्रिकाधारकांना पॉस मशीनद्वारे धान्यवाटप

0

नाशिक । दि. 1 प्रतिनिधी
जिल्ह्यातील रेशन दुकानांच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेत पॉस (पॉईंट ऑफ सेल) यंत्रणेद्वारे सर्व रेशन दुकानांवर ‘पॉस’ मशीन देण्यात आले असून गेल्या एक महिन्यात अन्नसुरक्षा योजनेतील 4 लाख 23 हजार 259 शिधापत्रिकाधारकांना पॉस मशीनद्वारे धान्याचे वितरण करण्यात आले आहे.

संपूर्ण जिल्ह्यात ही यंत्रणा प्रभावीपणे राबवली जाणार असल्याने धान्य वितरणात पारदर्शकता येईल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

आज महसूलदिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाचे कामकाज अधिकाधिक स्मार्ट करण्याच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या उपायोजनांबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी माहिती दिली.

यावेळी रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी रेशन दुकानांमध्ये पॉस मशीन बसवण्यात आले असून या दुकानांना डिजिटलायझेशनची झळाळी देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील 97 टक्के दुकानांमध्ये ही यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून लवकरच जिल्ह्यातील 100 टक्के रेशन दुकानांचे डिजिटलाझेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या दुकानांवर केवळ अंगठ्याच्या ठश्यानेे शिधापत्रिकाधारकाला धान्याचे वितरण होणार आहे.

रेशन दुकानांच्या संगणकीकरणाबरोबरच त्याचे डिजिटलायझेशन करण्यात येणार होते. यासाठी जिल्ह्यातील शिधापत्रिका लाभार्थी ग्राहकांची आधार जोडणी प्रक्रिया करण्यात येत आहे. या मशीनद्वारे आता भ्रष्टाचार कायमचा बंद होणार आहे. जे धान्य दिले जाणार आहे त्याची नोंद त्या पॉस मशीनमध्ये होणार आहे.

लाभार्थ्यांना सरकारने ठरवून दिलेल्या धान्याचा कोटा बरोबर मिळणार आहे. यासाठी लाभार्थ्यांकडून आधारकार्ड , बँक पासबुकची झेरॉक्स, गॅस कार्डची झेरॉक्स, मोबाईल नंबर अशी कागदपत्रे घेण्यात आली असून अन्नसुरक्षा यादी, अंत्योदय, पिवळे कार्ड अशा लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*