एका लग्नाची गोष्ट… अनेकांच्या अंगलट!; उपस्थित पोलीस चौकशीच्या फेर्‍यात

0
नाशिक | नाशिक येथे दोन दिवसांपूर्वी एक लग्नसोहळा पार पडला. राजेशाही थाटाच्या या लग्नास नाशिकसह मुंबई तसेच इतर जिल्ह्यांतील खासदार, आमदार, अभिनेते, अभिनेत्री यांसह विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांची हजेरी होती. काही वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कर्मचारीही हजर होते.

मात्र हे शाही लग्न कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याच्या नातलगाच्या मुलीचे असल्याचे उघडकीस आल्याने उपस्थितांची गाळण उडाली आहे. नाशकात झालेल्या या लग्नात देशभरातील डॉन, बुकी आणि मोठमोठ्या गुन्हेगारांचाही सहभाग असल्याचे समोर येत आहे.

त्यामुळे गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून लग्नाचा पाहुणचार घेणार्‍या पोलिसांमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या पोलिसांचे जबाब घेतले जात असून त्याचा अहवाल तयार करून कारवाईची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उंटवाडी रोडजवळील एका प्रशस्त जागेत राजेशाही थाटामाटात हा लग्नसोहळा झाला. या सोहळ्यात शहरातील अनेक प्रतिष्ठित मंडळीही सहभागी झाली होती. लग्नसोहळा शहरातील तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या घरातील असल्याने अनेकांनी हजेरी लावणे पसंत केले.

शहर पोलीस दलातील एक सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आदी अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनीही हजेरी लावली. मात्र हे लग्न देशात साखळी बॉम्बस्फोट घडवणार्‍या व दहशतवादी कारवाया करणार्‍या दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नातलगांपैकी होते.

लग्नसोहळ्यानंतर याची वाच्यता होताच हे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. एका कार्यकर्त्याने हा प्रकार पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांंच्या निदर्शनास आणताच त्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात त्यांनी लग्नास हजर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे जाबजबाब नोंदवले आहेत.

संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर काय कारवाई होते तसेच लग्नाला कोणकोणते ‘डॉन’ हजर होते याची उत्सकता ताणली गेली आहे.

उपस्थितांचे धाबे दणाणले : ‘त्या’ लग्नाचा बार उडाल्यानंतर चौकशीचे फटाके फुटू लागले आहेत. बॉलिवूडमधील आघाडीच्या दोन अभिनेत्री, काही अभिनेते यांची लग्नाला हजेरी होती. शिवाय एक स्टार अभिनेता येण्याच्या प्रयत्नात होता.

परंतु त्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळेल म्हणून त्यास येण्यापासून रोखण्यात आल्याची चर्चा आहे. लग्नात देशातील बुकी आणि गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्ती हजर असल्याने या लग्नकार्यावर गुप्तहेर संस्थेचे लक्ष असल्याचे समोर आल्याने लग्नास हजेरी लावणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

*