राहुरी विद्यापिठात साकारला प्लॅस्टीकचा पहिला रस्ता

0

प्लॅस्टिकचा रोडसाठी पुनर्वापर हे एक ‘रोल मॉडेल : डॉ. दलवाई

राहुरी विद्यापीठ (वार्ताहर) – परिसरातील पडलेला प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी त्याचा चक्क रस्त्यासाठी वापर केला आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातील चारही विद्यापीठातच नव्हे तर देशात प्रदुषणावर मात करून साठलेल्या प्लॅस्टिकच्या कचर्‍यातून चक्क प्लॅस्टिकचा रस्ता तयार करणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे अग्रणी ठरले आहे. विद्याथ्यार्ंनी राबविलेल्या या अभूतपूर्व उपक्रमाचे देशात कौतूक होत आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून त्याचा प्लॅस्टिकचा रस्ता तयार करण्याच्या उपक्रमाचा काल रविवारी दि. 21 रोजी श्रीगणेशा करण्यात आला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्लॅस्टिक कचर्‍याचा पुनर्वापर करून रोड तयार करण्याच्या उपक्रमाचे नवी दिल्ली येथील कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. अशोक दलवाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्‍वनाथा होते.
कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्लॅस्टिकचा रोडसाठी केलेला पुनर्वापर हा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमामुळे प्लॅस्टिकने होणार्‍या प्रदुषणावर आळा बसून डांबरी रोडवरील येणार्‍या खर्चात बचत होईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुरू केलेल्या प्लॅस्टिकचा रोडसाठी पुनर्वापर हे एक ‘रोल मॉडेल’ आहे. या रोल मॉडेलचा आदर्श पूर्ण देशाने अवलंबावा, असे आवाहन डॉ. दलवाई यांनी केले.
याप्रसंगी वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, डॉ. किरण कोकाटे, डॉ. राजेंद्र पाटील, उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा म्हणाले, ‘स्वच्छ आणि हरित विद्यापीठ’ या संकल्पनेखाली विद्यापीठातील प्लॅस्टिक कचरा हा वेगळा गोळा केला जातो. आतापर्यंत 1.5 टन प्लॅस्टिक गोळा केले आहे. या प्लॅस्टिकचा उपयोग रोड बनविण्यासाठी करण्यात येत आहे. त्याचबरोबर कुजणार्‍या कचर्‍यापासून कंपोष्ट खत तयार करण्यात येत आहे. या पद्धतीचे रोड यापूर्वी वेगुर्ला नगरपालिकेने केलेले आहेत. याप्रसंगी डॉ. दलवाई यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आणि विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रांना भेटी दिल्या.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून सर्वत्र स्वच्छ भारत अभियानाचा डंका वाजविला जात आहे. त्याच अनुषंगाने विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवून स्वच्छता अभियानाला सुपीक कल्पकतेतून हातभार लावला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या मानाच्या तुर्‍यात या अभिनव उपक्रमाची भर पडली आहे.
प्लॅस्टिकच्या रस्त्याचा शुभारंभ रविवारी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सर्व मान्यवर व अतिथी, विद्यार्थी, निमंत्रितांनी वेळेवर कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. मात्र, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, ते यजमान असलेले कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा यांच्यासह त्यांचे काही समर्थक अधिकार्‍यांनी हा कार्यक्रम गौण समजून तेथे तब्बल 2 तास उशिराने हजेरी लावली. त्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.
तर कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आणलेले प्लॅस्टिकवजा डांबरही कुलगुरूंची प्रतिक्षा करताना तोपयर्र्ंत थंडगार पडून गेले होते. कुलगुरू आणि त्यांच्या चमूमुळे या अभिनव कार्यक्रमाला काही अंशी गालबोट लागल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांमध्ये उमटल्या.

हा आहे फायदा…
विद्यापीठातील गोळा केलेल्या प्लॅस्टिक कचर्‍याचे मशिनमधून बारीक तुकडे केले जातात. हे प्लॅस्टिक हॉटमिंक्स प्लॅटमध्ये 1600 डिग्री तापमानाला वितळविले जाते. डांबराच्या एकूण आकारमानाच्या 10 टक्के प्लॅस्टिक टाकल्याने डांबरावरील खर्च कमी होतो. रोडचे आयुष्य 5 वर्षांनी वाढते, पावसाचे पाणी रस्त्यात न साचता रस्त्यावरून वाहून जाते.

 

 

LEAVE A REPLY

*