1 लाख 37 हजार शेतकर्‍यांची पिक विमा योजनेकडे पाठ

0

ऑनलाईन विमा भरण्यास शुक्रवारी रात्रीपर्यंत मुदत वाढ

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री फसल विमा योजना खरीप हंगाम या योजनेला यंदा जिल्ह्यात प्रतिसाद कमी असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आली. गतवर्षी जिल्ह्यातील 3 लाख 52 हजार शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यंदा 31 जुलैपर्यंत 1 लाख 13 हजार कर्जदार आणि 1 लाख 2 हजार बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी यात सहभाग घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेकडून देण्यात आली.

 

मोठा गाजावाजा करून केंद्र आणि राज्य सरकारने केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री फसल विमा योजना खरीप हंगामात शेतकर्‍यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यासाठी मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँका सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, या विमा योजनेला जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत प्रतिसाद कमी असल्याचे दिसत आहे. कर्जमाफी आणि अन्य कारणामुळे शेतकर्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली असल्याचे सांगण्यात येत आहे

 

यासह गेल्यावर्षी विमा भरलेल्या शेतकर्‍यांना विमा कंपन्याकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. जिल्ह्यात जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमधून 3 लाख 65 हजार शेतकर्यांनी विमा उतरवला होता. मात्र, यातील अवघ्या 65 हजार शेतकर्यांना विमा भरपाई मिळाली होती.

 

 

याचा फटका यंदा प्रधान मंत्री फसल विमा योजना खरीप हंगाम या योजनेला बसला असल्याचा अंदाज बँकाकडून व्यक्त होत आहे. यंदा जिल्हा बँकेच्या 1 लाख 13 हजार कर्जदारांनी आणि बिगर कर्जदार 1 लाख 2 हजार शेतकर्‍यांनी विमा उतरवला असल्याचे जिल्हा बँकेच्यावतीने सांगण्यात आले.

 

 

1 ऑगस्टला सरकारने विमा भरण्यास 4 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ करण्याची घोषणा केली. त्यानूसार जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये विम्याचा हप्ता स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, दुपारपर्यंत राज्य सरकारचे आदेश आल्यानंतर बँकेच्यावतीने विमा घेण्याचे काम थांबवण्यात आले. सरकारने केवळ बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऑनलाईन पध्दतीने विमा भरण्यास मुदत वाढ दिली आहे. ही मुदत शुक्रवारी 4 तारखेला संपणार असतांना पुन्हा शुक्रवारी रात्री 12 पर्यंत ऑनलाईन विमा भरण्यास मुदत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक पंडितराव लोणारे यांनी दिली.

 

जिल्हा बँकेत 1 ऑगस्टला जिल्ह्यातील 100 ते 125 शेतकर्‍यांनी विविध खात्यात विमा रक्कम स्वीकारली होती. मात्र, सरकारकडून आदेश आल्यानंतर तातडीने ही प्रक्रिया थांबवण्यात आली. तसेच शेतकर्‍यांकडून विम्यापोटी घेतलेली रक्कम त्यांच्या बचत खात्यात भरण्यात आली तर काही ठिकाणी ही रक्कम पुन्हा शेतकर्‍यांना रोख स्वरूपात परत करण्यात आली असल्याची माहिती बँक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

LEAVE A REPLY

*