पुराचे कारण दाखवून सहा हजार शेतकर्‍यांचा विमा नाकारला

0

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील सहा हजार शेतकर्‍यांचा तब्बल चार कोटी 82 लाखांचा पीक विमा ‘पूर’ या तांत्रिक गोष्टीमुळे विमा कंपनीने नाकारल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकर्‍यांच्या थकीत पीक विम्याबाबत विभागीय कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विमा कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. लवकरच या प्रश्‍नावर सकारात्मक तोडगा निघणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

विभागीय कृषी आयुक्त केंद्रेकर यांनी राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यांनी सचिन ठुबे, डॉ राजेंद्र बानकर, भारत तारडे, उमाकांत हापसे, सतीश तारडे आदी शेतकर्‍यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे, तालुका कृषी अधिकारी नामदेव रोकडे आदी उपस्थित होते.

विमा कंपनीने ‘पूर’ या तांत्रिक विषयामुळे तालुक्याचा विमा नाकारला आहे. ही बाब चुकीची असून जर पुरामुळे होणारे नुकसान ग्राह्य धरले जाणार असेल तर विमा कंपनीने फक्त नदीकाठावरील पिकांचा विमा उतरायला हवा होता. संपूर्ण तालुक्याचा विमा उतरवून आता कंपनी विमा नाकारत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या या मागणी नंतर कृषी विभागाने सकारात्मक पाठपुरावा केला असून यापुढेही विमा कंपनीसोबत पुन्हा चर्चा करून लवकरच तोडगा काढणार असल्याचेही केंद्रेकर यांनी सांगीतले.

दरम्यान तालुक्यातील विमा प्रश्‍नी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना पत्र पाठवून तालुक्यातील प्रलंबित विमा प्रश्‍न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी केली आहे. याबाबतचे पत्र ब्राह्मणी येथील आंदोलकांना पाठवून विभागाने माहिती दिली आहे. तर या संपूर्ण कार्यवाहीदरम्यान वेळ न दवडता तातडीने तालुक्याचा थकीत विमा वितरित करावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

राहुरी तालुक्याच्या थकीत पीक विमा मिळण्याबाबतचा मुद्दा आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला. शेतकर्‍यांना मंडलनिहाय भरपाई न देता, गाव किंवा वैयक्तिक पंचनामे करूनच यापुढे विमा मिळावा, अशी मागणी आमदार कडू यांनी विधानसभेत केली आहे.

LEAVE A REPLY

*