पारनेरच्या पाच जणांना जन्मठेप

0

जुन्या वादातून झाली होती हत्या

अहमदनगर (प्रतिनिधी) – जुन्या वादाच्या कारणातून पाच जणांनी एकास बेदम मारहाण केली होती. यात बाबाजी चिमाजी हुलावळे (रा. वाफारेवाडी, ता. पारनेर) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोषी धरुन जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बळीरास भागाजी वाफारे, भागाजी शिवराम वाफारे, ज्ञानदेव सोन्याबापू वाफारे, संतोष किसन वाफारे व नंदा बाळशीराम वाफारे (सर्व रा. वाफारेवाडी, ता. पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

31 ऑक्टोबर 2006 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मयत बाबाजी हुलावळे हे त्यांच्या घरी बसले होते. यावेळी आरोपी त्यांच्या घरी आले. जुन्या वादावर पडदा टाकण्यासाठी बैठक घ्यायची आहे. असे म्हणून त्यांनी लगट केली. त्यावेळी जिजाबाई बाबाजी हुलावळे म्हणाल्या की, बाजीरावने माझ्या मुलाला मारले आता कशाची मिटींग घेता. असे म्हणाल्याचा राग येऊन आरोपींनी हुलावळे यांच्या कुटुंबातील चार जणांना शिवीगाळ, दमदाटी करुन बेदम मारहाण केली.

या दरम्यान चार आरोपींनी त्यांच्या हातातील दांड्याने बाबाजी यांच्या डोक्यावर वार केले. त्यांना वाफारे वस्तीकडे फरपटत नेले. त्यांना सोडविण्यासाठी (पत्नी)जिजाबाई, (मुलगा) सतीष, (मुलगी) मंगल हे सर्व बाबाजी यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांना देखील लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. दरम्यान वस्तीतील काही ग्रामस्थांच्या मदतीने बाबाजी यांना सोडविले. मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे उपचारासाठी टाकळी ढोकेश्‍वर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

2 नोव्हेंबर 2016 रोेजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिजाबाई हुलावळे यांच्या फिर्यादीनुसार पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश मानगावकर यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

मंगळवारी (दि.1) या खटल्याची अंतिम सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील अ‍ॅड. अनिल घोडके यांने काम पाहिले. तसेच अ‍ॅड. पी. एस. गटाणे यांना सहाय केले तर जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सतिष पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. घटनेतील फिर्यादी, मयताची मुलगी, तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व साक्षी पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने बळीरास भागाजी वाफारे, ज्ञानदेव वाफारे, संतोष वाफारे व नंदा वाफारे यांना सक्तमजुरी तर भागाजी वाफारे यांच्या वयाचा विचार करुन त्यांना साधी जन्मठेप व प्रत्येकी 8 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. 

 

LEAVE A REPLY

*