पांगरमल प्रकरणी तीन तास युक्तीवाद

0
19 आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील पांगरमल येथे बनावट दारुमुळे नऊ जणांचा बळी गेला होता. या खटल्यातील 19 जणांवर मोक्का (संघटीत गुन्हेगारी) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.1) नाशिकच्या मोक्का न्यायालयात या खटल्यावर तीन तास युक्तीवाद करण्यात आला. आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील अजय मिसार यांनी दिली.

दि. 19 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक मतदारांनी प्रमाणापेक्षा जास्त मद्य प्राशन करुन आनंद घेतला होता. त्यानंतर तिसर्‍या दिवशी मद्य प्राशन करणार्‍यांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत एकूण नऊ जणांना मृत्युला सामोरे जावे लागले होते. या घटनेचा तपास करताना पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे यांनी मयत झालेल्या मतदारांनी पिलेली दारु कोठून आणली होती. याची सखोल चौकशी केली होती.

त्यानंतर ही दारु जिल्हा रूग्णालयातील कॅन्टीनमध्येच तयार होत असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी या घटनेतील सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन बनावट दारु तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले मिथेनॉल हस्तगत केले होते. त्यानंतर जीतू गंभीर, जाकीर शेख, मोहन दुग्गल यांच्यासह 17 आरोपींना अटक केली होती. तसेच दारु घेण्यासाठी ज्यांनी पैसे पुरविले होते.

अशा पंचायत समितीच्या सदस्या मंगला आव्हाड व जिल्हा परिषद सदस्य जयश्री मोकाटे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी 17 जणांना अटक केली असून भाग्यश्री मोकटेसह अन्य दोघे अद्याप पसार आहेत. तर या घटनेतील एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे. या गुन्ह्यातील मोठी टोळी पोलिसांनी उघड केल्यानंतर हा तपास सीआयडीसीकडे वर्ग करण्यात आला होता. या दरम्यान सर्व आरोपींवर शुक्रवार दि.14 जुलै 2017 रोजी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या खटल्याची मंगळवारी नाशिक येथील मोक्का न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी या प्रकरणावर तीन तास युक्तीवाद सुरू होता. या घटनेत नऊ जणांचा बळी गेला आहे. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. या घटनेत चौघांना जामीन मिळाला असून त्यांना पुन्हा पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकार पक्षाच्या वकीलांनी केली आहे. हा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यामुळे पहिल्या तपासात ज्या त्रृटी आढळून आल्या आहेत, त्यांची पुर्तता करणे आहे. या घटनेतील अन्य दोन आरोपी पसार आहेत त्यांचा शोध घेणे आहे.

त्यामुळे ज्यांना न्यायालयीन कोठडी आहे त्यांना देखील पोलीस कोठडी मिळावी असा युक्तीवाद न्यायालयात मांडण्यात आला आहे. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आज अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यभर गाजलेल्या पांगरमल दारुकांडातील आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळते की नाही. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोघे पसार, 13 अटक,
चौघांना जामीन, एक मयत –
या घटनेतील राजू बुगे हा आरोपी मयत झालेला आहे. त्यामुळे त्याला गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे. तसेच या घटनेतील दादा वाणी याच्यावर भेसळ प्रकरणात धुळ्यात यापुर्वी मोक्का लागलेला आहे. घटनेतील भाग्यश्री मोकाटे व सुरजितसिंग गंभीर ही दोघे पसार आहेत. यातील 13 जणांना अटक असून चौघांना जामीन झालेले आहे. या प्रकरणाला मोक्का लागल्यामुळे हा खटला आता नाशिक न्यायालयात सुरू आहे.

यांच्यावर मोक्का दाखल- जाकीर कादर शेख (रा. तारकपूर), जीतू उर्फ जगजितसिंग किसनसिंग गंभीर (रा.सिंधी कॉलनी, तारकपूर), हमीद अली शेख, सुरजितसिंग गंभीर (रा. तारकपूर), मोहन श्रीराम दुग्गल, सोनू उर्फ संदीप मोहन दुग्गल (गावडेमळा, नगर),  वैभव उर्फ शेखर जयसिंग जाधव (पाईपलाईनरोड),  दादा उर्फ प्रविण भालचंद्र वाणी (रा. धुळे), याकुब युनिस शेख (रा. कल्याणरोड), शिवसेना जिल्हा उप्रमुख भिमराज गेणू आव्हाड, रावसाहेब गेणू आव्हाड, महादेव किसन आव्हाड (रा. पांगरमल), पंचायत समितीच्या सदस्या मंगला आव्हाड (रा. पांगरमल) जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री मोकाटे (रा. इमामपूर) गोविंद मोकाटे (रा. इमामपूर), भरत रमेश जोशी (सिव्हील हाडको),  अमित वासुमन मोतीयानी (रा. नाईक हॉस्पिटल), अजित उर्फ नन्ह्या गुलराज सेवानी (रा. नवलेनगर), नवनाथ बबन धाडगे (रा. माळीवाडा) अशा 19 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*