पांगरमल दारुकांड प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

0

10 जणांना न्यायालयीन कोठडी; 11 ऑगस्टपर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील पांगरमल येथे बनावट दारूमुळे नऊ जणांचा बळी गेला होता. या खटल्यातील 19 जणांवर मोक्का (संघटीत गुन्हेगारी) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.1) नाशिकच्या मोक्का न्यायालयात या खटल्यावर तीन तास युक्तीवाद करण्यात आला.
काल सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यात मोहन दुग्गल, सोनू दुग्गल व याकूब शेख या तिघांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अन्य 10 जणांची 16 पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच तपासी अधिकार्‍यांना 11 ऑगस्टपर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश मोक्का न्यायालयाने दिले आहेत.
दि. 19 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक मतदारांनी प्रमाणापेक्षा जास्त मद्य प्राशन करून आनंद घेतला होता. त्यानंतर तिसर्‍या दिवशी मद्य प्राशन करणार्‍यांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत एकूण नऊ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. या घटनेचा तपास करताना पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी मयत झालेल्या मतदारांनी पिलेली दारू कोठून आणली होती. याची सखोल चौकशी केली होती.
त्यानंतर ही दारू जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्येच तयार होत असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी या घटनेतील सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले मिथेनॉल हस्तगत केले होते. त्यानंतर जीतू गंभीर, जाकीर शेख, मोहन दुग्गल यांच्यासह 17 आरोपींना अटक केली होती. तसेच दारू घेण्यासाठी ज्यांनी पैसे पुरविले होते अशा पंचायत समितीच्या सदस्या मंगला आव्हाड व जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी पोलिसांनी 17 जणांना अटक केली असून भाग्यश्री मोकाटेसह अन्य दोघे अद्याप पसार आहेत. तर या घटनेतील एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे. या गुन्ह्यातील मोठी टोळी पोलिसांनी उघड केल्यानंतर हा तपास सीआयडीसकडे वर्ग करण्यात आला होता. या दरम्यान सर्व आरोपींवर शुक्रवार दि.14 जुलै 2017 रोजी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या खटल्याची मंगळवारी नाशिक येथील मोक्का न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी या प्रकरणावर तीन तास युक्तीवाद सुरू होता. या घटनेत नऊ जणांचा बळी गेला आहे. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. या घटनेत चौघांना जामीन मिळाला असून त्यांना पुन्हा पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकार पक्षाच्या वकीलांनी केली आहे.
हा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यामुळे पहिल्या तपासात ज्या त्रुटी आढळून आल्या आहेत, त्यांची पूर्तता करणे आहे, या घटनेतील अन्य दोन आरोपी पसार आहेत त्यांचा शोध घेणे आहे. त्यामुळे ज्यांना न्यायालयीन कोठडी आहे त्यांना देखील पोलीस कोठडी मिळावी असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला होता. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आज अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते.
आज बुधवारी (दि.2) या खटल्याची सकाळी नाशिक येथे सुनावणी झाली. त्यात मोहन श्रीराम दुग्गल, सोनू उर्फ संदीप मोहन दुग्गल (गावडेमळा, नगर) व याकूब युनिस शेख (रा. कल्याणरोड) या तिघांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर अन्य 10 जणांना 16 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे अजय मिसर व अ‍ॅड. महेश तवले काम पाहत आहेत.

या 10 जणांना न्यायालयीन कोठडी – जाकीर कादर शेख (रा. तारकपूर), जीतू उर्फ जगजितसिंग किसनसिंग गंभीर (रा.सिंधी कॉलनी, तारकपूर), हमीद अली शेख, वैभव उर्फ शेखर जयसिंग जाधव (पाईपलाईनरोड), दादा उर्फ प्रवीण भालचंद्र वाणी (रा. धुळे),  शिवसेना जिल्हा उप्रमुख भीमराज गेणू आव्हाड, भरत रमेश जोशी (सिव्हील हाडको),  अमित वासुमन मोतीयानी (रा. नाईक हॉस्पिटल), अजित उर्फ नन्ह्या गुलराज सेवानी (रा. नवलेनगर), नवनाथ बबन धाडगे (रा. माळीवाडा) अशा 10 जणांना 16 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मोहन दुग्गल, सोनू दुग्गल व याकूब शेख या तिघांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. घटनेतील जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री मोकाटे व सुरजितसिंग गंभीर ही दोघे पसार आहेत. तर पंचायत समितीच्या सदस्या मंगला आव्हाड (रा. पांगरमल), गोविंद मोकाटे (रा. इमामपूर), महादेव किसन आव्हाड (रा. पांगरमल), रावसाहेब गेणू आव्हाड यांना जामीन देण्यात आलेला आहे. अशा 19 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई सुरू आहे.

LEAVE A REPLY

*