पंचवटी खून प्रकरणी ४ जण ताब्यात

0
नाशिक | दि. १९ प्रतिनिधी – पंचवटीतील पेठरोड परिसरातील शनिमंदिरामागील नवनाथनगर येथे गुरूवारी झालेल्या खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी विविध ठिकाणांवरून ४ संशयीतांना ताब्यात घेतले आहे.  संतोष उघडे, संतोष पगारे, गणेश उघडे, बंडू मुर्तडक (रा. सर्व पंचवटी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या किरण राहूल निकम या ३५ वर्षीय युवकांचा गुरूवारी रात्री धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले होतेे. पंचवटीतील पेठरोडवरील शनिमंदिरामागील नवनाथ नगर येथे किरण निकम हा रात्री आपली दुचाकी एम. एच. १५ एफ. डी. ८३८९ वरून घरी परतत असताना घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर चार ते पाच अज्ञात इसमांनी त्याला अडवले व त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.

या हल्ल्यात त्याच्या पाठीवर, मानेवर, पोटावर गंभीर जखमा झाल्याने रक्ताच्या थारोळयात खाली पडला व जागीच त्याचा मृत्यु झाला होता. या घटनेनंतर किरणचे नातेवाईक व मित्र परिवाराने घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यावेळी वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

घटनेची माहीती कळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहा. पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तर हल्लेखोरांना शोधण्यासाठी तातडीने विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आली होती. या पथकांनी आज ४ संशयीतांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून हा खून बाजार समितीत बाजीपाला खरेदीच्या जुन्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*