सर्वसाधारण क्षेत्र घोषित करण्यास शिक्षकांचा विरोध

0

जिल्हा परिषद :  अवघड क्षेत्रातील शिक्षकांनी दिला उपोषणाचा इशारा

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राज्यातील अन्य जिल्हा परिषदेप्रमाणे नगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा सर्वसाधारण क्षेत्रात घोषित करण्याचा ठराव घेण्यात आला होता. या ठरावाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील तीनशेहून अधिक अवघड क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत धाव घेत या शाळा अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात वर्ग करण्यास तीव्र विरोध दर्शवला. तसेच प्रशासनाने या शाळा सर्वसाधारण क्षेत्रात वर्ग केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याचे धोरण ठरवतांना राज्य सरकारच्या ग्राम विकास विभागाने बदलीसाठी सर्वसाधारण आणि अवघड क्षेत्रातील शाळा अशी वर्गवारी केली आहे. ही वर्गवारी करतांना नगरसह राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या नाकीनऊ आले. आपली शाळा अवघड क्षेत्रात वर्ग व्हावी, यासाठी शिक्षकांनी आपले वजन वापरून अनेक ठिकाणी फेरबदल करण्यास भाग पाडले असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे प्रशासन आणि पदाधिकारी यांची डोकेदुखी वाढली होती.
राज्यातील चार जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत ठराव घेवून संपर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सर्वसाधारण क्षेत्रात वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पावलावर पाऊल ठेवत नगर जिल्हा परिषदेन गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा सर्वसाधारण क्षेत्रात वर्ग करण्याचा ठराव मंजूर केला. याचे वृत्त समजताच अवघड क्षेत्रातील शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत धाव घेत अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारण क्षेत्रात वर्ग करण्यास तीव्र विरोध दर्शवला.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना निवदेन देण्यात आले आहे. सर्वसाधारण सभेच्या ठरावामुळे अवघड क्षेत्रातील शिक्षकांवर अन्याय होणार आहे. त्यांची हक्काची बदली होण्यास अडचण होणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वेक्षण करून दुर्गम भागातील शाळा शोधल्या होत्या.

 

यामुळ संपूर्ण जिल्हा सर्वसाधारण घोषित केल्यास दुर्गम भागात काम करणार्‍या शिक्षकांवर अन्य ठरणार असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. यावेळी बाळासाहेब सालके, विशाल खरमाळे, मच्छिंद्र कदम, मोहन शिरसाठ, दिनेश ढावेभट, योगेश घुमे, शैलेश ढमाळ, सचिन गाडीलकर, मच्छिंद्र भापकर, सुनील नरसाळे, वैभव ठाणगे, शरद म्हस्के, बाबुराव कदम आदी उपस्थित होते.

 

राहुरी तालुक्यातील वावथर जांभळी परिसारातील 9 प्राथमिक शाळांना शालेय पुस्तके, पोषण आहाराचे साहित्य तीन तालुक्यातून वेगवेगळ्या मार्गाने पोहच करावे लागते. या शाळा अतिशय दुर्गम भागात आहे.  यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाच्या नवीन आदेशानूसार दुर्गम भागातील सर्व जागा भराव्यात, यामुळे वाड्यावस्त्यांवरील शिक्षणाची समान संधी उपलब्ध होणार असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

 

शिक्षकांच्या बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र अशी वर्गवारी केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने संपूर्ण जिल्हा सर्वसाधारण करण्याचा ठराव केला असून हा ठरावाच्या प्रती शासनाला पाठवण्यात येणार आहेत. शासन जो निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य करावा लागेल.
-रवींद्र बिनवडे,
मुख्य कार्यकारी अधिकारी

LEAVE A REPLY

*