मेहनतीला पाच महिने, मोबदल्यास पाच मिनिटे

0
नाशिक | दि. ९- शिवारात कांदा रोपणापासून शेती मशागत ते बाजार समितीत कांदा लिलावासाठी घेऊन जाण्याचा कालावधी सुमारे साडेचार ते पाच महिन्यांचा असतो. यात श्रम, वेळ आणि पैसा ही गुंतवणूक करून शेतकरी त्या मालाचा भाव आणि दर्जा ठरवू शकत नाहीत.
लिलावात जेव्हा कांदा विक्री होतो तेव्हा माल खरेदीसाठी व्यापार्‍यांची चढाओढ असते. या प्रक्रियेत मात्र शेतकर्‍यांना आपल्याच मालाकडे बघ्याच्या भूमिकेत राहून पाहावे लागते. त्याच्या कांद्याचा आणि मालाचा दर ठरवला जातो तो फक्त दोन ते पाच मिनिटात.

कांदा दर गेल्या सहा महिन्यांपासून कमी असल्याने उत्पन्न खर्च निघत नसल्याची ओरड कांदा उत्पादक करीत आहेत. कांद्याला हमीभाव, अनुदान, सरकारकडून खरेदी आदी मागण्या कांदा उत्पादक करीत असल्याने कांद्याचा विषय शेतकरी, व्यापारी, बाजार समित्यांसह सर्वसामान्य नागरिकांतही चर्चेचा विषय असतो. कांद्याचा वांदा होऊन त्यामुळे सरकारावर परिणाम होण्याच्या घटनाही पूर्वी घडलेल्या आहेत.

त्यामुळे कांद्याच्या आंदोलनाचा शासन धसका घेत असते. मात्र यंदा कांदा मुबलक होऊन आणि त्याची आवक दिवसाकाठी नाशिकच्या १४ बाजार समित्या, उपआवारातून सरासरी एक लाख क्विंटल होत असताना त्याच्या दरावर लिलावात फारसा चढ झालेला दिसत नाही. शेतकर्‍यांनी सुमारे पाच महिने अर्थ, श्रम आणि वेळ घालवत तयार केलेल्या कांद्याचा दर बाजार समितीत ठरत असताना शेतकर्‍यांना मात्र या प्रक्रियेत आपल्या मालाबद्दल तेथे काही बोलण्याची सोय नसते.

एकवार, दोनवार आणि तीनवारदरम्यान वाढणार्‍या क्विंटलचा भाव कानात जीव आणून ऐकून घेणे आणि मिळालेल्या मोबदल्यावर समाधान मानण्याची वेळ तेव्हा अशा शेतकर्‍यांवर असते. जो भाव मिळतो त्यातून जागेवरच कोणाचे काय देणे-घेणे मिळवावे याची चिंता चेहर्‍यावर स्पष्ट व्यक्त होत असताना परवडो अथवा नाही तर मिळालेल्या भावात कांदा व्यापार्‍यांच्या खळ्यावर रवाना करण्याची वृत्ती प्रत्येक बाजार समितीत शेतकर्‍यांमध्ये असते.

डोळ्यादेखत मालाची बोली कमी लागत असताना शेतकर्‍यांना तो विकणे क्रमप्राप्त ठरत असते. कारण हंगामासाठी उधार, उसनवार, मजुरी आणि इतर कर्जाची रक्कम परत करण्यासाठी कांदा विक्री करणे हाच पर्याय योग्य ठरतो.

दरात फरक पडेना
बाजार समितीत कांदा विक्रीला आणला तर काय भाव मिळतो याची सतत धास्ती असते. जिल्ह्यातील कोणत्याही बाजार समितीत कांदा विक्रीस आणला तर कांद्याचे दर सर्वत्र सारखेच असतात. उलट अंतरात वाढ होत असल्याने कांदा वाहतुकीचा खर्च अधिक मोजण्याचा भुर्दंड सहन करावा लागतो, अशी प्रतिक्रिया चापडगाव येथील कांदा उत्पादक किशन चिंतामण आव्हाड यांनी दिली.

बाजार समितीत आवक
समिती आवक
लासलगाव २३२९५
पिंपळगाव ३१७३०
उमराणे ११५००
चांदवड ७५००
निफाड ३९५१
सायखेडा ६०१५
(आवक क्विंटलमध्ये)

LEAVE A REPLY

*