राहुरीत कांद्याची विक्रमी आवक

0

भावात 100 रुपयांनी वाढ ; परराज्यांतून मागणी वाढली

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – येथील बाजार समितीत शुक्रवारी (दि. 11) कांदा लिलाव झाला. यावेळी एकूण 56 हजार 997 गोण्या कांद्याची विक्रमी आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असून भावाची पातळीतही प्रतिक्विंटल 100 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. कांद्याच्या विविध प्रतवारीमध्ये चांगली वाढ झाली आहे.

गेल्या एक महिन्यापासून 1600 ते 1800 रुपये अशी वर्षभरातील सर्वोच्च भावाची पातळी गाठल्यानंतर आता कांद्याची मजल तीन हजार रुपये प्रतिक्विंटलकडे सुरू झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत 10 हजार क्विंटल गोण्या कांद्याची आवक वाढूनही भावाची पातळीही पुन्हा 100 रुपयांनी वाढल्याने राहुरी बाजार समितीत कांदा आणणार्‍या शेतकर्‍यांची चांगलीच चांदी झाली आहे.

काल आवक वाढली. मागील आठवड्याच्या तुलनेत भावात स्थिरता आली आहे. चांगल्या दर्जाचा एक नंबरचा कांदा 2000 रुपयांपासून 2700 रुपयांपर्यंत विकला गेला. दोन नंबरचा कांदा 1201 रुपयांपासून ते 1975 रुपये विकला गेला. तीन नंबर 500 ते 1180 रुपयाने विकला गेला. कालच्या लिलावात गोल्टी कांद्यानेही विक्रम केला. 1322 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत गोल्टी कांदा विकला गेला. गोल्टी कांद्याच्या भावात वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सध्या परराज्यांतून कांद्याला मागणी वाढली आहे. दक्षिणेकडील तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक आदी राज्यांतील व्यापार्‍यांनी राहुरी बाजार समितीत कांदा खरेदी सुरू केल्याने आवक वाढूनही भावाची पातळी वाढत आहे. चांगल्या दर्जाच्या एक नंबरच्या कांद्याला दोन हजार 700 रुपये असा सर्वोच्च भाव मिळाल्यानंतरही दोन हजार 775 रुपयांनी 18 गोण्या, दोन हजार 750 रुपयांनी 59 गोण्या, दोन हजार 725 रुपयांनी 29 गोण्या, दोन हजार 700 रुपयांनी 191 गोण्या, असा सर्वोत्तम भाव मिळाल्याने शेतकरी आनंदात आहेत. सहा महिन्यांपूर्वी मातीमोल भावाने कांदा विकणार्‍या शेतकर्‍यांंच्या पदरात सोन्याचे मोल पडले आहे.

LEAVE A REPLY

*